पान:मी भरून पावले आहे.pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रूमच्या बाहेर उभी होते तर डॉ. कामत आले. मला म्हणाले, 'काय, बघावंसं वाटतं ना, भेटावंसं वाटतं ना?' मी म्हटलं, 'हो. पण काय करणार डॉक्टर? नाही ना मी जाऊ शकत?' त्यांच्या ते थोडंसं लक्षात आलं. ते म्हणाले, 'थांबा.' आणि आत जाऊन त्यांनी नर्सला सांगितलं त्या बाईला गुपचूप आत घे आणि तिचा ड्रेसबिस चेंज कर. अगदी तुमच्यासारखा कर म्हणाले. आणि दलवाईंना भेटव तिला. तिनं मग मला आत घेतलं. सगळं काय काय करतात ते मला केलं. नर्स बनवली. टोपी लावून बिवून. आणि मग डॉक्टर रूममध्ये आत गेले. आणि ह्यांना सांगितलं, 'हे बघा दलवाई. तुमच्यासाठी एक तरुण नवीन नर्स आणलेली आहे. तुम्हांला ठेवायची का तिला? आवडेल बघा.' तर मी ड्रेसमध्ये असल्याने त्यांनी मला ओळखलं नाही. कसे ओळखणार? तर मग डॉक्टर म्हणाले, 'काय हो दलवाई, तुम्ही स्वतःच्या बायकोला सुद्धा विसरलात की काय?' हे म्हणाले, 'काय मेहरू, तू? मी नाही ओळखलं. कशी आली?' म्हणून त्यांचा चेहरा खुलला अगदी. मी म्हटलं, काय म्हणता तुम्ही? बरे आहात नं? 'हो बरा आहे, म्हणाले. हसले बिसले. पण तो माणूस, सांगते, सायन्स डिपार्टमेंटमध्ये ते स्केलेटन - सापळा ठेवतात नं माणसाचा, तसे दिसत होते. सगळ्या अंगातली शक्तीच जाते हो ऑपरेशनने. हा किडनी ट्रबल ज्यांना असतो त्यांचं शरीर पुढे पुढे चंद्रासारखं गोल होतं. नुसतं तोंड नाही. सगळं शरीर चंद्रासारखं गोल होतं. तो नॉर्मल राहातच नाही. तर अशा रीतीनं १०-१२ दिवस तिथं ठेवलं. मग म्हणाले का घरी न्यायला हरकत नाही. पण मास्क लावायचा, रूममध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. फार स्ट्रिक्टली वागायचं. तुम्ही तेवढं त्या रूममध्ये जायचं. बाकी कुणी नाही. पवारांच्या घराच्या तिथं आम्ही राहात होतो. तिथं वहिनींनी सगळं धुवून-बिवून पुसून रूम स्वच्छ केली. पलंग-बिलंग व्यवस्थित केला. मग दलवाईंना तिथं नेलं आणि तिकडे ठेवलं. कोणी आलं भेटायला का एक फट दाराची उघडी ठेवायची. खुर्ची बाहेर ठेवायची आणि तिथून बोलायचं. ते गप्पा मारू शकत होते. एवढ्या बंदोबस्तात नगरकर तर चोरासारखे यायचे. कधीकधी मी किचनमध्ये असायची. गाडीने हा माणूस यायचा. गाडी कधी ठेवायचे, आत माझ्या पाठीमागे येऊन कधी उभे राहायचे ते मला समजायचं नाही. आणि मी एकदा म्हणाले, 'दादा, तुम्ही सी.आय.डी. ऑफिसर शोभता बाबा. अहो, तुमच्या गाडीचा आवाजसुद्धा येत नाही. आणि तुम्ही माझ्या मागे येऊन उभे राहिलात म्हणजे खरोखर तुम्ही त्या डिपार्टमेंटच्या लायकीचा माणूस आहात.' आणि ते काय करायचे, त्यांना इतकं

मी भरून पावले आहे : ११५