पान:मी भरून पावले आहे.pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाली. सगळे निघून गेले. मी विचार केला रात्रीचं तिथंच राहायचं. का तर आपण हॉस्पिटलमधून जर घरी आलो तर ती रात्र काय आपल्याला चांगली जाणार नाही. म्हणून मी रूममध्येच थांबले. इतके सगळे माझे नातेवाईक होते. पण कोणालाही असं वाटलं नाही का हिच्याबरोबर रात्रीचं रहावं. कोणीच आलं नाही आणि मी पण कोणाला म्हटलं नाही, की तुम्ही माझ्याबरोबर थांबा म्हणून. सकाळी उठल्याबरोबर बच्चूबेन आणि पालेकर या माझ्या मैत्रिणी दोघी धावत हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे आल्या. माझ्या सोबतीला म्हणून. आणि रात्री मी एकटी असताना बाजूच्या रूममध्ये जो पेशंट होता त्या पेशंटने आपल्या बायकोला सांगितलं की, 'जा, तिचा नवरा वर गेलाय ऑपरेशनसाठी आणि ती बाई एकटी आहे. ती रात्र एकटी काढू शकणार नाही. तर तू तिच्या सोबतीला जा.' ती बाई माझ्या ओळखीची नाही, पाळखीची नाही, नातं नाही, गोतं नाही. ती माझ्याजवळ २-३ तास थांबली. नंतर मी पडले. पडल्यानंतर सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर बातमी तर मिळायला पाहिजे ना. काय झालं? ऑपरेशनला ह्यांना रात्री घेऊन गेले ती स्टरलाइझ्ड रूम असते, पॅकबंद रूम असते. ज्याच्यात बाहेरचा वारासुद्धा जाऊ शकत नाही. तिथं दोन नर्सेस वेगळ्या, मास्क बांधलेल्या आणि ते डॉक्टरही मास्कमध्येच. कोणालाही आत येऊ देत नाहीत. त्या खोलीमध्ये ह्यांना त्यांनी नेलं. ऑपरेशन झालं. सक्सेसफुल झालं. दलवाईंना लघवीही झाली. ही बातमी इतकी दणकून आली का सगळं हॉस्पिटल गरजलं. या पेशंटला लघवी झाली. याचा अर्थ किडनी अॅक्सेप्ट झालेली आहे. मी आता त्या वेळी वाटलेलं सगळं एक्स्प्रेस करू शकत नाही. मी खाली आले. ग्राउंड फ्लोअरला त्यांची सिटिंगरूम होती. सगळे आलेले. हजारो माणसं तिथं येऊन भेटून गेली. हा आला भेटला, तो आला भेटला. काँग्रॅच्युलेशन्स हं भाभी. म्हणजे इतका सगळ्यांना आनंद झाला.
 तिथं मग १०-१५ दिवस त्या रूममध्ये ठेवायचं असतं. कोणी भेटायचंच नाही. ऑपरेशन झाल्याला २-३ दिवस झाले. मी तिथं त्या रूमच्या बाहेरच असायची. दर्शनसुद्धा नाही. दर्शन कसलं? रूमच्या बाहेर मी उभी रहायची. थोडीशी डोकवायची. मला सांगायची नर्स, अशी अशी तब्येत आहे. आणि मी बाहेर बसलेली असायची. खाली नाही, वर नाही. खालची रूम सोडून दिली होती. त्यामुळे तिथंच थोडा वेळ बसायची. घरी जायची. दोन-तीन दिवसांनंतर मग काय झालं? डॉक्टर म्हणाले, फोनवर बोलायला हरकत नाही. मग तिथल्याच इंटरनल फोनवर मला दलवाईंशी बोलायला मिळालं. असे ८ दिवस गेल्यानंतर मी अशीच

११४ : मी भरून पावले आहे