Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायला काहीच हरकत उरली नाही. आणि अशा रीतीनं. ते सगळं वातावरण जुळून आलं. मग डॉक्टर काय म्हणाले, डॉक्युमेंट वगैरे करायला पाहिजे. हा मनुष्य जगेल का नाही हे नक्की नाहीये. आणि मग ऑपरेशनचा दिवस ठरवला गेला. दोन्ही पेशंट्स एका बेडवर घेतात. एकाची किडनी काढायची आणि ठराविक तासांमध्ये दुसऱ्याला लावायची. दोघांना एकाच रूममध्ये ठेवलं होतं.
 संध्याकाळी हा जमाव! हॉलच्या हॉल भरला. खालून वरपर्यंत. का तर दलवाईंचं ऑपरेशन आहे. आणि ते सक्सेसफुल होईल याची गॅरंटी कुणाला नाही. एवढं मोठं ऑपरेशन. किडनीचं एरवी कोणी ऑपरेशन करत नाही. आणि दलवाईंचं ऑपरेशन होणार आहे. म्हणून सगळे त्यांचे सिंपथायझर्स जमा झाले होते. सगळ्यांना असं वाटत होतं का हा माणूस आपल्याला परत भेटेल का नाही? सगळे मला येऊन भेटत होते. त्यांना येऊन भेटत होते. तेवढ्या सगळ्यांच्या समोर डॉक्टरांनी डॉक्युमेंटस् आणली. त्यात लिहिलं होतं का आम्ही खुषीनं ऑपरेशनला परवानगी देतोय. कुठल्याही गोष्टीला डॉक्टर किंवा हॉस्पिटल जबाबदार नाही. माझी सही घेतली, काही विटनेसेस. असे सगळे डॉक्युमेंटस तयार केले.

 दलवाईंनी जरासुद्धा असं दाखवलं नाही, का मी आता मरणाच्या तोंडात जातोय आणि तिथून परत येणार नाही. झोपून नव्हते. चांगले बसून गप्पा मारत होते. हास्य-विनोद डोळा मारून-बिरून. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं. आणि सगळे लोक जमलेले असे. म्हणजे बायका-पुरुषपण सगळे असे त्यांना बिदा करायला आलेले.
 ऑपरेशनची वेळ झाली. स्ट्रेचरवर दलवाईंना घातलं. निरोप घेतला आणि लिफ्टपर्यंत सगळे गेले. पवारसाहेब तिथं आलेले होते. त्यांनी मला बाजूला घेतलं. त्यांनी मला विचारलं, "आपण ठरवलंय ते बरोबर आहे ना? आपण ऑपरेशन करायचं ना? आम्ही हा डिसीजन घेतला असं असेल तर तुम्हांला ते मंजूर आहे न? आपल्या मनाची तयारी दोन्हीची ठेवली पाहिजे." अशी समजूत घातली त्याना लहान मुलासारखी. खरं तर मी त्यांच्यापेक्षा खूप मोठी. आणि खरं म्हटलं तर त्या लोकांनाच वाईट जास्त वाटत होतं. नगरकरांना, पवारसाहेबांना, सगळ्यांनाच माझ्याकडे बघून जास्त फील होत होतं. का तर ही बाई काय करणार? भाभीच काय होणार? असं सगळं त्यांच्या तोंडावरनं कळत होतं. आणि अशा वातावरणात मी ह्यांना लिफ्टमध्ये सोडलं. टाटा केला. थोड्या वेळानं सगळ्यांच्या जाण्याची वेळ

मी भरून पावले आहे : ११३