Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही किडनी दलवाईंना फिट होते. कोणाचीही असू दे. मग काही लोकांनी विनोद पण केला, खुन्याची किडनी बसवली तर दलवाई खून नाही ना करणार? ऑपरेशनला खर्च किती तर पंचवीस हजारच्यावर. त्या काळात एवढा खर्च म्हणजे थोडा नाही झाला. आणि बाकीचे औषध-बिवषधांचे वेगळेच. त्यामुळे पैशाचा प्रश्न आला. तर एवढे पैसे जमा करायचे कसे? मग पवारसाहेब, ए.बी. शहा, नगरकर असे सगळे विचार करायला लागले. का पैसे कुठून आणायचे? मग त्यांनी गणित काढलं. अमक्याकडून आपण किती घ्यायचे ५,०००/- तमक्याकडून २,०००/-, याच्याकडून किती १०,०००/-, फलाण्याकडून किती घ्यायचे. त्या वेळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असल्यामुळे आता गव्हर्नमेंटकडून किती घ्यायचे? ठीकय. ते ५,०००/- आपल्याला देतील असा आकडा घातला आणि पवारसाहेब मागायला गेले. शहासाहेबांना पैशांचा व्यवहार समजायचा नाही. म्हणजे त्यांना जमायचं नाही बिचाऱ्यांना. ते म्हणायचे पैसे माझ्याकडे दिल्यानंतर हिशेब ठेवायचं काम मी करीन. पण मिळवायचं मला नाही जमणार. तर नगरकर आणि पवार या दोघांनी ते काम हातात घेतलं आणि ते चालू झालं. एके दिवशी सकाळी उठल्याबरोबर पेपरात वाचते तो काय बातमी! सरकारतर्फे रुपये ५०,०००/- दलवाईंच्या किडनीच्या ऑपरेशनकरता बहाल केलेले. आणि अशी बातमी पसरली सगळीकडे. थक्क झालो आम्ही. मी तो पेपर घेतला आणि हॉस्पिटलमध्ये गेले. मी घरी आले होते. दोन दिवसांनी, तीन दिवसांनी मी घरी यायची. कपडे बदलायची. आंघोळ करायची. पवारवहिनी मला पटकन खायला-प्यायला करून घालायची. का तर रोज हाल व्हायचे. त्यामुळे आल्याबरोबर ती करायची. तर त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेले. ५०,०००/- रुपये देणगी! सगळ्यांना असं वाटलं का सगळं कर्ज निघून गेलं. आणि ही बातमी तेव्हा मुसलमानांना कळली, म्हणजे जातीयवादी मुसलमानांना. ज्यांना हे सगळं नको होतं आणि जे मानत होते का हा कसला मुस्लिम? याला कशाला जगवायला हवं? ह्याच्यावर त्या सगळ्यांनी लेखही लिहिले. त्यांनी असंही सांगितलं, किडनीचे हजारो पेशंटस इथे मरतात. सरकारने सगळ्यांनाच मदत करावी. या माणसाला जिवंत ठेवायची गरजच काय? सरकारच याला त्याच्या कामामध्ये मदत करत आहे. हा माणूस धर्माच्या विरुद्ध, समाजाच्या विरुद्ध काम करतो. तरी याला सरकार जगवतं, असं उलट त्यांनी म्हटलं. पण सरकारने त्याची काही पर्वा केली नाही. आणि ते ५०,०००/- रुपये जसलोक हॉस्पिटलच्या बँकेत जमा झाले. आता प्रश्नच मिटला ना! मग किडनीच्या

११२ : मी भरून पावले आहे