Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या काळामध्ये फिरोज दारुवाला हा पिक्चरमध्ये आला. येरवड्याच्या जेलमध्ये तो होता. तिथपर्यंत बातमी सगळ्या पेपरमधून गेली. त्याच्या डोक्यात आलं आणि त्याचे आई-वडीलसुद्धा पेपर वाचून भेटायला आले. त्यांनी किडनी मिळेल असं सजेस्ट केलं. फिरोजला असं वाटत होतं की मला आता फाशीची शिक्षा होणार, मी आता एका भल्या माणसाला किडनी दिली तर त्याच्याबद्दल कदाचित एखाद्या वेळेला माझी सजा माफ होईल. हा हेतू होता त्याचा खरा. तो आम्हांला नंतर कळला. तर त्यानं घरी पत्रव्यवहार केला आणि सांगितलं का असं असं आहे. म्हणून मग त्याचे आई-वडील आमच्याकडे आले. आई-वडील बिचारे खूप चांगले. त्याची बायको, एक मुलगी हे सगळे आले. आम्ही भेटलो त्यांना सगळ्यांना. बाप तर म्हणाला, "हा मुलगा असला निघेल, चार-पाच खून करणारा, अशी मला कल्पना सुद्धा सहन होत नाही. वाटलंसुद्धा नव्हतं की हा मुलगा असा निघेल म्हणून." मग सगळं ठरल्यानंतर पेपरवाले माझ्या खूप मागं होते त्या वेळी. त्यांनी माझे बरेच इंटरव्ह्यू वगैरे घेतले. त्यांनी मला नंतर प्रेशराइज करायला सुरुवात केली, दारुवालाला सोडवा. आपण त्याची किडनी घेतलेली आहे. तर त्याची शिक्षा कमी करा. म्हणजे त्याला फाशीची शिक्षा होती ती देऊ नका असा आग्रह धरा. पण आम्ही त्याला बळी पडलो नाही. का तर सरकारचा मामला होता. हे म्हणाले, 'सरकार करील ते खरं. आपण मध्ये बोलायचं नाही.' का दवाखान्यात फिरोज दारुवालाला अॅडमिट केलं. तो हॉस्पिटलमध्ये आला. त्याला एका फ्लोअरवर ठेवला. आमच्या फ्लोअरवर नव्हता तो. दुसऱ्या फ्लोअरवर त्याला नेलं. पोलिसांचा जंगी पहारा आणि मग माझ्याशी बोलायला तो मागत होता, म्हणून मला परमिशन दिली, की त्याच्या रूममध्ये जा. तेव्हा मी बघितलं, तर काय? ३२-३३ वर्षांचा मुलगा. बारीक. चांगला दिसायला. पण त्याचे डोळे बरोबर नव्हते. असे मोठे मोठे म्हणजे खुन्याचे डोळे दिसतच होते. बघितल्यानंतर माणसाला भीती वाटावी असा होता तो. मला काय तिथं जास्त बोलायचंच नव्हतं. बघायचं आणि यायचं. मी दोन-तीनदा त्याच्या रूममध्ये जाऊन आले. का तर मला असं वाटत होतं की हा मनुष्य किडनी देणाराय. माझा नवरा वाचणाराय. मला त्याच्याबद्दल तशी सिंपथीही वाटत होती. वाटत होतं की याची सजा कमी व्हावी. पण हे म्हणाले की आपण मध्ये पडायचे नाही. हा गव्हर्नमेंटचा मामला आहे. त्याची टेस्ट झाली. ३० टक्के किडनी बरोबर आहे असं दिसलं आणि सगळीकडे बातमी पसरली का ही किडनी बसू शकते. दलवाई याच्यात जगतील.

मी भरून पावले आहे : १११