कंडिशन खूपच वाढलेली होती. चेहरा नुसता दिसायचा. हातपाय असे वाकडेतिकडे झालेले - एवढे एवढे झालेले, असा मोटकाच. इथून उचलायचा. तिथे ठेवायचा. आणि त्याची बायको, मुलं बघितली तर काय देखणी. पण तो बोलायचा बिलायचा खणखणीत. हे जेवण चांगलं नाही, हे वाईटेय, याच्यातच त्याचं लक्ष असायचं. जेव्हा यांच्या ऑपरेशनची तारीख ठरली आणि डॉक्टरनी त्यांना सांगितलं, तेव्हा म्हणाला, 'दलवाई, ही तारीख चांगली नाहीये. डॉक्टरला सांगा आणि ही तारीख बदलून घ्या.' पण हे म्हणाले, 'नको, नको तशा गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. त्यामुळे ते तुम्ही काही मला सांगू नका. डॉक्टर जे ठरवतात ते बरोबर ठरवतात. डॉक्टरच्या सल्लयानेच जे काय व्हायचंय ते होऊ दे.'
आता किडनी कुठे मिळणार, हा प्रश्न. किडनी घ्यायची तर त्यांना चार मामा होते. एक सख्खी मावशी होती. पण ते सगळे वयस्क होते आणि रोगी होते. त्या काळामध्ये गावात टी.बी.चे रोगी जास्त असायचे. जवळजवळ त्या सर्वांना टी.बी. होता आणि त्यांना त्याबाबत सीरियसनेस नव्हता. त्या काळामध्ये टी.बी.चा रोग म्हणजे खूपच भयानक समजला जायचा. सगळ्यांनाच होतो ना, काय त्याच्यात आहे एवढं, असं म्हणून गप्प रहायचे. औषध घ्यायला पैसा नाही, खायला अन्न नाही, अशा रीतीने ते वाढतच जायचं. त्यामुळे त्यांची किडनी घेण्याचा प्रश्नच आला नाही. बरं, सख्खं भावंडं नसल्यामुळे तोही प्रश्न आला नाही. कुणाला सांगणार? जबरदस्तीने किडनी द्या असं सांगून होत नाही. म्हणून त्या काळामध्ये बाहेरची किडनी घ्यायची असं ठरलं. पेपरमध्ये अनाऊन्समेंट दिली आणि कोणाचं उत्तर येतं का बघितलं. जोरात शोधणं चालू होतं. काय करायचं? कोण देणार? कुणाची जुळेल? नगरकर वगैरे खूप अपसेट झाले. ते म्हणाले, पैशांची कमी नाहीये, आपण रस्त्यावर जाऊन झोळी पसरून उभे राहिलो तरी हमीदच्या नावाने मदत करणारे तुम्हांला हजारो लोक भेटतील. पैशांची कमी नाहीये. असंही होतं की कोणाचीही किडनी तुम्ही मॅच होते म्हणून घेऊ नका. का तर तो माणूस मग तुम्हांला आयुष्यभर प्रेशराइज करतो. समजा एक माणूस आला. त्याची किडनी तुम्ही घेतली, तर तो म्हणणार, "माझ्या किडनीवर तू जगलेला आहेस, माझ्या किडनीवर जगतो आहेस. माझ्यासाठी हे कर, ते कर." आणि त्यानं जगवलेलं आहे म्हणून माणूस प्रेशराइज होतो. म्हणून तशी सुद्धा किडनी घ्यायची काही गरज नाही. त्या माणसानं परत ह्याला तोंड दाखवायला नको, असा माणूस पाहिजे असे सगळे विचार करीत होते. त्यामुळे किडनी शोधणं सोपं नव्हतं.
पान:मी भरून पावले आहे.pdf/125
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११० : मी भरून पावले आहे