Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्रास दिल्यानंतर मला थोडं असं वाटतं का मला कोणी तरी आहे, म्हणून मी करतो. जाणूनबुजून तुझा अपमान करायचाय असं माझ्या मनात कधी नसतं." आमची रुबीना जेव्हा शाळा-बिळा, कॉलेज-बिलेज सोडून आली आणि त्यांच्याजवळ राहिली, तेव्हा मी त्यांच्याजवळ जास्त राहायचीच नाही. मी दारामागे बसलेली असायची. तरी ते दहा वेळा दाराच्या मागे बघायचे, म्हणायचे, "कुठंय तुझी आई, गेली वाटतं कुठं तरी. तिथं नाहीये दिसत, ती गेली वाटतं." तेव्हा रुबीना म्हणायची, "काय बाबा, तुम्ही ममाच्या फार मागं लागताय. बिचारी एवढं करते. जवळ असली तरी तुम्ही बोलता. आता ती गेली असेल तर जाऊ दे नं तिला. काय हरकत आहे? मी समोर बसलेली आहे तरी तुम्हांला तीच हवी. तुम्ही ममाला असा त्रास देत जाऊ नका. ती रडत असते दिवसभर. ममाला खूप फील होतं. ती कुणाला दाखवणारै? ममाला काय वाईट वाटत नाही का?" असं करून ती समजूत घालायची.

 या काळामध्ये हे जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा जयप्रकाश नारायणजी पण किडनीच्या रोगानेच ॲडमिट झाले होते. ते सोळाव्या मजल्यावर, आम्ही दहाव्या मजल्यावर. रोज त्यांना बघायला काही माणसं यायची आणि त्यांना बघून झालं की दलवाईंना बघायला यायची. त्यांच्यात एसेम, प्रभुभाई संघवी वगैरे रेग्युलर येणारी अशी खूप मंडळी – समाजवादी – यांना पण बघायला यायची. मी पण सारखंसारखं जरा वेळ मिळाला की, जेपींना असं डोकावून बघायची, त्यांना नमस्कार करायची, 'कैसे है आप?' असं विचारायची. मला ते बरं वाटायचं. इतका मोठा माणूस आपल्याशी बोलतो. म्हणून मला ते बरं वाटायचं. त्या दोघांचं डायलिसिसही एकाच दिवशी, बरोबर व्हायचं. सुरुवातीला जेपींना ते जनरल वॉर्डमध्ये सगळ्यांचं डायलिसिस जिथं व्हायचं तिथं आणायचे. मग ह्यांनी डॉक्टरांना कंप्लेंट केली आणि सांगितलं की, "एवढा मोठा माणूस आणि तुम्ही डायलिसिस जनरल वॉर्डमध्ये करता? त्या माणसाला वेगळी रूम द्या. मला तुम्ही दिली नाही तरी चालेल." असं करून ह्यांनी त्यांना परस्पर वेगळी रूम द्यायला लावली. जेपी मात्र म्हणायचे, ‘सगळ्या पेशंटस् बरोबर मी डायलिसिसला जाईन. मला वेगळी रूम नकोय.' जाताना असे बरोबरच कॉरिडोर मधून जायचे ना. नेहमी भेट व्हायची, “कैसे है", अशी नेहमी विचारपूस व्हायची. स्ट्रेचरवर हे झोपलेले आहेत, ते झोपलेले आहेत आणि बोलताहेत आणि आम्ही स्ट्रेचरबरोबर चालत जायचो. मग एक दिवस काय झालं, जेपींना डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज दिल्यानंतर तिथं गर्दी जमली,

मी भरून पावले आहे : १०७