पान:मी भरून पावले आहे.pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जन्मभर मी बाबांची सेवा करेन. ते मला परवडेल." त्या वेळी ती खूप लहान होती. इला तर खूपच लहान होती. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये यायलाही नको-नकोसं व्हायचं. रुबीना सारखी पळून यायची हॉस्टेलमधून. चार दिवस रहायची. मग मी म्हणायची, "अभ्यासाचं नुकसान होतं. वर्ष वाया जातं. तुम्ही जा." म्हणून ढकलून काढायची. तिनं एक वर्ष कसं तरी काढलं. म्हणाली, माझं डोकं चालतच नाही. मी पढणारच नाही. त्यामुळे ती मुंबईला आली. नणंदेकडं रहायची. तिथूनच ती हॉस्पिटलमध्ये यायची. ती आल्यावर मला मदत करायची. ती बाबांचं सगळं करायची. मग ते माझ्या हातून काहीच करून घ्यायचे नाहीत, तिच्याच हातून सगळं करून घ्यायचे."बाब्या, तू अमुक कर. बाब्या, तू तमुक कर." ती सगळं करायची. अशीच्या अशी उभी रहायची. जरा सुद्धा बाबांना सोडून ती जायची नाही. रात्रीचे आठ वाजायचे तेव्हा ती जायची. आता तर बिछान्यात पडूनच होते ना. लघवीचं पॉट द्यावं लागायचं. पाणी द्यावं लागायचं. नर्सला बोलवायचं, औषध द्यायला सांगायला लागायचं. आणखी काही करायला सांगायचं, हे काम तर असायचंच ना. स्पंजिंग वगैरे नर्सच करायची. ते काही करावं लागायचं नाही. पण नर्सला बोलावून करवून घ्यायचं. आपण फक्त पेशंटसमोर बसायचं, बोलायचं, जेवण-बिवण, कपडे बदलणे वगैरे सगळं नर्स करायची. त्यांनी स्पेशल नर्सेस ठेवलेल्या होत्या. मला खरं तर त्यांनी काहीही काम ठेवलेलं नव्हतं. पण मी स्वतःहून आपलं काही तरी करायची. खाणं मीच आणून घ्यायची. नर्सची मदत तर खूपच व्हायची. सगळ्याच बाबतीत. नखं वाढायची, नखं कापली की दुखायचे त्यांचे हात. मी कापायची नेहमीच. पण ते खूप बोंबाबोंब करायचे. नखं मोठी झालेली असली ना की मी म्हणायची, "काय हो तुमची नखं वाढलीत!" तर हे म्हणायचे की, “हे बघ मेहरू, हे काम माझं नाही. हे काम तुझं. हे तुझं काम आहे की नाही? तू कापलेली नाहीत म्हणून ती वाढलीत की नाही? मला कापता येत नाही. माझी नखं दुखतात." हॉस्पिटलमध्ये असताना एकदा त्यांची नखं खूप वाढलेली होती. माझं लक्ष काही गेलं नाही. संडासला त्रास व्हायचा त्यांना. त्या दिवशी खूप झाला. तर त्यांनी नखांनी खडा ओढून काढला. त्यामुळे जखमा तर झाल्याच त्यांना. पण सगळी नखं कापून घाण काढावी लागली. स्वच्छ धुवावं लागलं. खूप मला त्रास झाला. त्या रागात मी खूप बडबडले पण, “कसली म्हटलं कामं मला करायला लागतात बघा तुमच्यामुळे." त्यांना ते फील झालं फार. ते म्हणाले, "सॉरी हं. माझ्यामुळे तुला त्रास होतो.

मी भरून पावले आहे : १०५