पान:मी भरून पावले आहे.pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डॉ. उर्सेकरांनी मोठं ऑपरेशन केलेलं होतं. दुसऱ्या डोळ्यामध्ये सारखे ड्रॉप्स घालायचे होते. कारण त्या डोळ्याचंही ऑपरेशन करायचं चाललं होतं. पण त्या परिस्थितीमध्ये त्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं का नाही करायचं? नाही, असा निर्णय घेतला. शेवट शेवट तर तो डोळा भयंकर लागला दिसायला. एक दिवस मी उठले नि हा डोळा फिरलेला दिसला तर मी म्हटलं, आता हा माणूस काही जगणार नाही. मी सारखं बघायला लागले. तर म्हणाले, आरसा आण. आरसा बघितल्यानंतर मी म्हटलं तुमच्या डोळ्यावर परिणाम झालाय. डॉक्टरना सांगितलं. त्यांच्याही ते लक्षात आलं. मग ऑपरेशन करायचं का? तर म्हटलं, नाही करायचं. आता पुष्कळ झालं हे सगळं, ऑपरेशन अमुकतमूक. मग या किडन्या. डायलिसिसवर किती दिवस ठेवणार? किडन्या तर तुम्हांला काढायलाच पाहिजेत. दोन्ही किडन्या काढण्याचं मोठं ऑपरेशन होतं. महिन्या का दोन महिन्यांची मुदत असते. त्या काळात दुसरी किडनी बसवावी लागते. त्या काळात डायलिसिसवर काम भागवायचं. पण तो कायमचा उपाय नव्हता. हे सहा महिने डायलिसिसवर होते. आता किडनीचा शोध. पेपरमध्ये प्रसिद्ध झालं. पण डॉ. कुरुव्हिलांचं मत असं झालं का तुम्ही जर पैसे देऊन किडनी लावली तर ती टिकत नाही. का तर तिला भावना नसते, माणसाची लागणी नसते. ते जरा स्पष्ट बोलले. खरं तर ते डॉक्टर आहेत. त्यांनी असं सांगायला नको. पण म्हणाले, माझं असं मत आहे की जर तुम्ही पैसे देऊन किडनी घेतली तर ती तुम्हांला जुळेल असं नाही. तुम्ही घाई करू नका.

 पण मग किडनी देणार कोण? माझी प्रकृती तपासायला घेतली. माझा खूप मोठा चेकअप झाला. मला ब्लडप्रेशर निघालं. म्हणाले, एवढ्या लहान वयात हिला ब्लडप्रेशर झालं कसं? किडनी तपासली. पण मला बी.पी. असल्यानं माझी किडनी लावता येणार नाही असं सांगितलं. सगळ्यांनी असं सांगितलं की हिची आपण किडनी काढून हिला अधू केली तर हिची सेवा कोण करणार? म्हणून माणूस बाहेरचा पाहिजे. मग आमची रुबीना अठरा वर्षांच्या आत होती. हॉस्टेलमध्ये होती पुण्याला, फर्ग्युसन कॉलेजच्या. तिनं बाबांना पत्र लिहिलं, की बाबा, मी तुम्हाला किडनी देईन. डॉक्टर म्हणाले की पूर्ण अठरा वर्षांचं वय झाल्याशिवाय आपण तिची किडनी घेऊ शकत नाही. अठरा वर्षांची झाल्यावर तिची किडनी लावायची असं ठाम मत झालं. तर तिला बोलावून हे पण समजावून सांगण्यात आलं का "बेटा तू किडनी देणं खाऊ नाही. तुझी किडनी काढली तर तुझ्याशी कोणी लग्न करणार नाही.” तर ती म्हणाली, “मी लग्न करणार नाही.

१०४ : मी भरून पावले आहे