पान:मी भरून पावले आहे.pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळं अंगचं रक्तच बाहेर निघून गेल्यावर अंगात गर्मी येणार कशी तुमच्या? रक्त बाहेर पडून मग हळूहळू शुद्ध होत होत आपल्या शरीरात शिरणार. त्यात कैक रक्त कमी व्हायचं. ते भरून कसं काढणार? मग २-४ दिवसांनी रक्ताच्या बाटल्या लावा. ते ब्लड चांगलं असलं पाहिजे. मॅच झालं पाहिजे. खूप प्रोसिजर असायची. त्यांची औषधं खूप महाग असायची.
 सुरुवात झाली तीच मुळी एक दिवसाआड डायलिसिस अशी. मग पैशाचा प्रॉब्लेम आला. मग सगळ्या पेपरमध्ये जाहीर केलं, दलवाईंना असं झालेलं आहे. कोणाला मदत करायची आहे त्या प्रत्येकाने चेक पाठवायचे. जसलोक हॉस्पिटलची बँक होती. त्या नावावर चेक यायचे. ते तिथं भरले जायचे. सगळ्या पैशाचा हिशेब शहासाहेब बघायचे. त्यांनी मला सांगितलं होतं, तुम्ही हिशेब घ्या. मी त्यांना म्हटलं होतं, मला पैशाचा हिशेब नको. मी पैसे सोडून सगळं काम करीन. मला पैशाचं काम जमणार नाही.
 सर्व महाराष्ट्रातून पैसे आले. लाख रुपये जमा झाले. पन्नास हजार सरकारचे म्हणजे उरलेले पन्नास हजार लोकांचे. दलवाईंच्या औषधपाण्याला पैसे कमी पडले असं नाही. बिलं जी यायची ती शहासाहेबांना द्यायची. शहासाहेब पेड करायचे. आठवड्याची बिलं तेव्हा २-३ हजार. म्हणजे त्या काळात २-३ हजार किती झालं? इतकं महाग पडायचं ते. डायलिसिसचा खर्च ४०० रुपये आणि रूमचा १०० रुपये. त्या दिवशी आम्ही रूम सोडून वर जायचे ना, तरी रूमचा १०० रुपये खर्च. त्या काळात ५०० रुपये स्वस्त नव्हते. पण आम्हांला त्रास झाला नाही. डोक्याला तसा ताप झाला नाही. आणि हे जेव्हा सुरू झालं, पैसे जेव्हा यायला लागले, तेव्हा हे म्हणाले, "मेहरू, हे सगळं काय?" म्हटलं, “हे तुम्ही कमावलेलं आहे. माणूस पैसा कमावतो. तुम्ही हे कमावलंय. एवढी माणसं तुमच्या पाठीशी उभी आहेत. तुम्हांला जिवंत ठेवण्यासाठी. तुमची वाहवा करण्यासाठी. हे सगळं कशासाठी आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, हे तुम्ही कमावलेलं आहे." मग चियरफुल असायचे.

 उगाचच रडारड असं काही नव्हतं. त्या वेळी जगायची आशा नव्हती तरी लगेच मरणार असं पण नव्हतं. सुरुवातीला हे सगळं असताना बरीच काँप्लिकेशन्स पण येत गेली; नाही असं नाही. कावीळ होणं, टी.बी. होणं, सारखीच अशी भीती असायची त्यामुळे. हे हॉस्पिटलमध्ये जायच्या आधीसुद्धा एका डोळ्याला ग्लॅकोमा झालेला होता. त्याचं ऑपरेशन पण झालेलं होतं.

मी भरून पावले आहे : १०३