पान:मी भरून पावले आहे.pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण गरज असायचीच. त्याच्याशिवाय तो जगणारच नव्हता. दोन दिवस नाही केलं तर तिसऱ्या दिवशी हाताला पेशंट लागत नसे. एक दिवस जगवण्यासाठी दहा तासांचं डायलिसिस तेव्हा करावं लागे. आता म्हणतात दोन तासांचं आहे. तीन तासांचं डायलिसिस आहे. घरी मशीन घेऊन जा, असं सगळं निघालेलं आहे. औषधांमध्ये फरक झालेला आहे. त्या वेळी तसं नव्हतं. डायलिसिसच्या दिवशी कुणीही भेटायला येऊ नका, असं सांगण्यात आलेलं होतं. त्या रूममध्ये कोणालाही जाऊ दिलं जायचं नाही.
 दुसरा दिवस चांगला जायचा. तेव्हा लोकांची रांग लागायची. रोज येणारी माणसं होती. पाळीपाळीनं एक दिवस येणारी माणसं होती. माणसांची अशी झुंडच्या झुंड असायची. मग विनोद, हसणं, बोलणं. मग त्यांच्यासमोर बसायला कॉट, खुर्च्या. उभं रहायला परवानगी, जागा होती. आणि दलवाई म्हणजे मोठा माणूस समजत होते. कोणी ऑर्डिनरी माणूस नाहीये. कोणी तरी मोठा. समोरच्या बेडवर सकाळी अशी सतराशे साठ पेपर्सची रांग लावलेली. ते दोन तास मी सगळे पेपर्स वाचून दाखवायची. फक्त इंग्लिश. मराठी मला वाचता यायचं नाही. त्यावर ते कॉमेंट करायचे. मला बोलायचे ही अमूक न्यूज, तमूक रिपोर्ट वाच. ते सांगायचे आणि मी वाचायची. डॉक्टर म्हणायचे, चांगला तुम्हांला मिळालेला आहे माणूस, सगळं तुमचं करतो. अशी चेष्टा-बिष्टा करायचे. ते डॉक्टरसुद्धा खूप चांगले होते. डॉ. कुरुव्हिला नि डॉ. कामत. दोघेही खूप चांगले होते. डॉ. कामत फॉरेनला जाऊन आलेले. इंग्लिश फ्ल्यूअंट बोलणारे. काय कपडे असायचे! तरुण होते. तेव्हा हे म्हणायचे, काय सुंदर दिसतो ग. कपडे बघ. त्याच्या पँटची किंमत काय असेल, टायची किंमत काय असेल. अशी थट्टा मस्करी. ते डॉक्टरसुद्धा मिक्सअप होणारे होते. जरासुद्धा मिजास नव्हती. माणसांशी कसं बोलावं ते त्यांना चांगलं माहीत होतं. यायचे, बोलायचे, विनोद करायचे. मला काही डिफिकल्टी असली तर डॉ. कुरुव्हिलांचे क्वार्टर्स तिकडेच होते. तिथं जायची. प्रायव्हेटली काही गोष्टी विचारायची. ते सगळे माझं समाधान करायचे. हिला काय कळतंय, हिला आपण कशाला सांगायचं, असं काही नव्हतं.
 डायलिसिस चालू असताना पेशंटच्या जवळ एक माणूस असायचाच. पेशंट गेला तर सांगणार कुणाला तुम्ही? ही भीती होती. एरवी नसलं तरी डायलिसिसच्या वेळेला माणूस असायलाच पाहिजे. त्यामुळे माणसं तिथं असायचीच.

 डायलिसिस चालू असताना फार त्रास व्हायचा. अंग थंड पडायचं.

१०२ : मी भरून पावले आहे