त्या मशीनचा आवाजसुद्धा इतका भयंकर, कुठं असा आवाज आला ना, की मला अजून वाटतं की मी डायलिसिसच्या रूममध्ये आहे. इतका तो आवाज माझ्या डोक्यात गेलेला आहे. नळ्या दोन्ही हाताला लावतात, सहज नस मिळत नाही. पन्नास वेळा टोचावं लागतं. हाताला नाही मिळालं तर पायाला टोचतात. काही नळ्या लावूनच ठेवलेल्या असतात, कायमच्या. त्याला नुसती सुई जोडायची आणि थोड्या वेळाने एका नसेमधनं सबंध रक्त शरीराबाहेर काढलं जातं, शुद्ध होतं आणि शरीरात जातं. ह्याच्यात रक्त कमी होतं. क्लॉट होण्याची भीती असते. क्लॉट झाला की मनुष्य खल्लास. त्याला वारंवार रक्त द्यावं लागतं. त्या माणसाचं ब्लड प्रेशर अप अँड डाऊन कधीही होऊ शकतं. त्यांचा हात धरून मी दहा तास बसायची, तोंडाकडे बघत. की हा माणूस जिवंत आहे का मेलाय, हे मुठीत हात धरून बघायचं. त्यांना त्या १० तासांमध्ये पाण्याचा एक घोट सुद्धा देत नसत. जेवणसुद्धा लिमिटेड असे. ते १० तास त्यांनाच नाही मलाही शिक्षा असायची.
बाथरूमला गेले तरी नर्सला सांगायची, जायची, चटकन परत यायची. हात धरूनच बसायची. का तर ते सोडायचे नाही हात आणि मला पण जावंसं वाटायचं नाही. असं वाटायचं, इथं काही झालं तर काय करायचं? आपण जर जवळ बसलो काही झालं तर असं सांगता येतं, बघा नर्स, काय झालं ते बघा. क्लॉट झाला का बघा, अमूक झालं का बघा. मशीनवर नजर ठेवून बसायची. म्हणजे आपलं पण दिवसभराचं अन्न-पाणी नाही. विश्रांती नाही. सारखं टेंशन. खुर्चीवर बसून टेंशन घालवायचं आणि आसपास सगळे तसलेच रोगी. लहान मोठे, कोणाशी तुम्हांला बोलायला नको. काही बोलणारा एकही मनुष्य नाही. बाहेर उठून जाण्याची सोय नाही आणि त्यातच उलट्या पण व्हायच्या. उलटी झाली का ताबडतोब आपण ट्रे घेऊन जायचं. उलटी पुसून काढायची. हे आपण करायचं किंवा नर्सला सांगायचं, तिनं करायचं. नर्स येईपर्यंत अंगावर होऊ नये म्हणून जपायचं. त्यानंतर सगळं आटपल्यावर पेशंटला - असा मुडद्यासारखा झालेला पेशंट - स्ट्रेचरवर नेऊन त्याच्या रूममध्ये टाकायचा. एकदा खोलीत गेला का तो झोपलाच. पण दुसऱ्या दिवशी मात्र तो फ्रेश व्हायचा. दुसरा दिवस नॉर्मल जायचा. नॉर्मल दिवशी मग खाणं-पिणं, बोलणं, हासणं-बिसणं व्हायचं. ताकद वाटायची. पण तेवढ्यापुरतीच. रात्र गेली का दुसऱ्या दिवशी डायलिसिस आहे याचं टेंशन यायचं. संध्याकाळ झाली का मलूल व्हायचे. उद्या परत डायलिसिस. त्यांना डायलिसिस प्रकार आवडायचा नाही. दहा तास पडून राहाणं आवडायचं नाही.
१०१ : मी भरून पावले आहे