पान:मी भरून पावले आहे.pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि ह्यांना आपल्या मुलासारखं सांभाळायचे. ते तिकडे येऊन बसायचे. दिवसाचे येऊन बसायचे. औषधपाणी आणायचे. तिथनं डिस्चार्ज मिळाला तेव्हा हजार रुपये बिल आलं होतं. ते त्यांनी भरलं. आणि सांगितलं की हमीदखान हा माझा मुलगा मी समजतो अन् कधी काही लागलं तर माझ्याकडे मागायचं, भाभी. अशा रीतीनं त्यांनी ते पार पाडलं, एवढं त्यांनी केलं.
 जसलोकचा मुक्काम सुरू झाल्यानंतर आता ट्रीटमेंट काय सुरू होणार आहे, याच्याकडे लक्ष दिलं. एक पारसी डॉक्टरीणबाई होती तिथं. ती म्हणाली, चल माझ्याबरोबर. अन तिनं मला बरोबर नेलं. आम्ही दहाव्या फ्लोअरवर होतो, तिनं मला एकोणीसाव्या फ्लोअरवर नेलं. तिथं डायलिसीसचं मशीन ठेवलेलं होतं. तिनं थोडंसं दार उघडून सांगितलं, 'बघ ते पेशंट कसे बसलेत.' बघितलं, तिला विचारलं, 'हे काय आहे?' तिनं सांगितलं, “हे मशीन आहे, इथं रक्त प्यूरिफाय होतं. एका नळीतनं रक्त काढतात, दुसऱ्या नळीतनं भरतात." मी म्हटलं, "एवढंच ना." मला वाटलं की एखाद्या वेळेला करावं लागत असेल. रोज बसतात हे कुणाला माहिती? मी विचारलं, "केव्हा केव्हा बसायला लागतं?" ती म्हणाली, "दहा तास बसायला लागतं. एक दिवसाआड. आणि माणूस जिवंत आहे तोपर्यंत.” हे ऐकलं अन् माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. अन् म्हटलं, बाप रे, ही ट्रीटमेंट कशी काय होणार? आणि याच्यामध्ये मनुष्य जगेल कसा? हे एवढं मी बोलले तिला आणि मी सोडलं तिला. मला काही सुचलं नाही. अन् अशी मी दलवाईंच्या रूममध्ये आले. माझ्या चेहऱ्यावरचं हा माणूस वाचत होता. त्यांना लगेच कळायचं की हिच्या मनात काहीतरी हालचाल चालू आहे. मला म्हणाले, “खरं सांग मेहरू. तू एकही गोष्ट माझ्यापासून लपवू नकोस. तू जशी सारं घट्टपणे घेतेस की नाही, तसं मी पण घेणार आहे. मी पण घाबरणार नाही. आपण दोघांनी मिळून हे सहन करू या. पण तू मला खरं-खरं सांग आणि मी त्यांना सांगितलं. त्यांनी ते ऐकलं. त्यानंतर त्यांना पण खूप वाईट वाटलं त्या वेळी. पण मला म्हणाले, "बरं झालं. कशी तुला शिक्षा झाली. आता मी गेलो की बस तू. मग कुणाशी भांडणार आहेस बघू तू." असं करून तो विषय त्यांनी टाळला.

 नंतर ट्रीटमेंट अशी सुरू झाली. पैसा कुठून आणायचा? तर नगरकर म्हणाले, पैशाची काळजी करायला नको. मी व्यवस्था करतो भाभी. भाभींनी नुसती रजा घ्यायची, हमीदची देखभाल करायची. भाभीनं हमीदकडे बघायचं. नवरा आहे. बायकोच त्याचं सगळं करू शकते. भाभीनं तसं करायचं.

मी भरून पावले आहे  : ९७