ना. बाहेर किडन्या ७५ हजार, एक लाख, पन्नास हजार रुपये अशा विकत मिळत होत्या. तर यांची आपण ही सोय करू असं नगरकरांना वाटलं. ठीक आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं, जसलोकमध्ये ॲडमिट करायचं. दुसऱ्या दिवशी दलवाईंना तिथून उचललं अन् जसलोकमध्ये ॲडमिट केलं.
ट्रान्स्प्लांट अजून खूप लांब आहे. ट्रान्स्प्लांट ही गोष्ट शेवटची. मनुष्य जगेल का मरेल हा शेवटचा निर्णय आहे. ट्रान्सप्लांट लगेच आज केलं असं नाही. जसलोकमध्ये गेलो तर एका रूमचे रोजचे शंभर रुपये पडत होते. पॉश रूम होती. दोन कॉट होत्या. शहासाहेब म्हणाले, नगरकर म्हणाले की मेहरू रहाणार आहे बरोबर, तिची पण सोय केली पाहिजे. ती त्रास घेणार आहे, तिला त्रास होऊन कसं चालेल, ती धडधाकट राहील तर हमीदचं बघेल. असा त्यांनी माझा खूप विचार केला. खाण्याची तिथं सोय केली आणि ॲडमिट करून ते गेले. गेल्यानंतर मी आणि हेच राहिलो. तर मला हे म्हणाले, "मेहरू, हे काय झालं?" मी म्हटलं, "काही नाही. आता आपली टेस्ट होणार आहे. अजून कन्फर्म झालेलं नाही. टेस्ट झाल्यानंतर आपण विचार करायचा, काय आहे ते." त्यामुळे तिथं आम्ही राहिलो ते पंधरा दिवस त्यांनी टेस्ट घेण्यात घालवले. लघवी घेतली, अमुक घेतलं, तमुक घेतलं. बाहेरचे रिपोर्ट त्यांना चालत नाहीत ना. रक्त टेस्ट केलं, ब्लडप्रेशर नव्हतं, हार्ट ट्रबल नव्हता, डायबेटिस नव्हता, असा काही विशेष रोग नव्हता. त्या टेस्टस् सगळ्या घेतल्या अन् टेस्टस् घेतल्यानंतर कन्फर्म झालं की किडन्या खराब झाल्या आहेत. आता काय करायचं, हा प्रश्न पडला. डॉक्टरांनी हे सांगितल्यावर आम्ही दोघं खूप अपसेट झालो. काही समजेना. लाख रुपयांचा खर्च. आपल्याकडे तर तेवढे पैसे नाहीत. कुठून एवढे पैसे आणणार? अन् हा रोग जाईल कसा? काय ट्रीटमेंट असेल? ट्रीटमेंटचे सुद्धा एवढे पैसे! नावसुद्धा ऐकलेलं नाही. कुठून एवढे पैसे येणार? यांनी माझे दोन्ही हात घट्ट धरले न् म्हणाले, “मेहरू, हे काय झालं ग. काय झालं हे!" मी म्हटलं, "घाबरायचं काही कारण नाही. आपण करू ना. माझ्या प्रॉव्हिडंट फंडातून मी पैसे काढीन. कुठे कुठे ठेवलेले काढीन. जितकं होईल तितकं आपण करू. तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही हा विचार करायचा नाही. तुम्ही हा विचार केलात, घाबरलात, तर रोग कसा बरा होईल? अन् मी कुणाच्याकडे बघणार?"
आता या अगोदरची एक गोष्ट सांगायची आहे. हे जेव्हा भाटियामध्ये होते तेव्हा यांचे एक चुलतभाऊ हसनशेठ म्हणून होते. यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते