आता काय करायचं? सबंध अंगावर सूज आली. पाणीसुद्धा जाईना. सगळ्यांना चिंता पडली. काही लोक म्हणायला लागले की इथली ट्रीटमेंट चांगली नाही म्हणून सुधारणा होईना. नंतर काय झालं की, डॉक्टरांची बैठक झाली. शेवटच्या दिवशी सगळ्या डॉक्टरांची बैठक. त्याच्यात मग शहासाहेब, नगरकर, शरद पवारसाहेब, गोविंद तळवलकर सुद्धा होते. डॉक्टरांनी सांगितलं की, दलवाईंना किडनीचा ट्रबल झालाय. किडनीचा ट्रबल म्हणजे काय, हे तेव्हा आम्हांला कळलं. दोन्ही किडन्या खराब झाल्यावर हा ट्रबल चालू होतो. माणसाला एक किडनी असते का दोन असतात हे सुद्धा पेशंटला माहीत नसतं. ते एक्स-रे सुद्धा फार भयंकर आहेत. ते काढल्यानंतर कळतं. सगळ्यांच्या किडन्या सारख्या नसतात. एक किडनी खराब झाली तर ती ते काढू शकतात आणि दुसऱ्या किडनीवर माणूस जगू शकतो. पण दोन्ही किडन्या खराब झाल्यानंतर ही परिस्थिती येते. हिला ट्रान्सप्लांटच करायला पाहिजे.
किडनीशिवाय तर चालणार नाही. खराब झालेली किडनी ठेवून चालणार नाही आणि दोन्ही काढून टाकूनही चालणार नाही. आता काय करायचं? कुठल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं? तर त्याला एक इलाज आहे - डायलिसिस. त्या मशिनवर बसायचं. दहा तास डायलिसिस करायचं. दुसरा इलाज आहे काय? तर दुसरा इलाज आहे. ऑपरेशनचा इलाज आहे. पण समजा भावाची किडनी, आईची किडनी, वडिलांची किडनी, बहिणीची किडनी दिली तर पुस्तकी ज्ञानाप्रमाणे पेशंट दहा वर्षं जगू शकतो. आणि ही सगळी नसतील अन् दुसऱ्या नातेवाईकाची दिली किंवा परक्या माणसाची दिली तर पेशंट पाच वर्षं जगू शकतो. ही पुस्तकातील गॅरंटी. मग आता काय करायचं? तर पुढचं सगळं करण्यासाठी हॉस्पिटल बदलावं लागेल. दलवाईंना चांगली ट्रीटमेंट द्यायचीय. त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं, असं ठरलं. जसलोक हॉस्पिटल तेव्हा नवीनच झालेलं होतं. चांगलीचांगली मशिनरी तिथं आलेली होती. डॉ. कुरुव्हिला सारखे स्पेशालिस्ट होते. कामतांसारखे सर्जन होते. ते फार प्रसिद्ध होते म्हणून सगळ्यांनी सूचना केली की जसलोक हॉस्पिटलमध्ये उद्या या माणसाला अॅडमिट करायचं. हे सगळं ठरलं आणि नगरकर बाहेर पडले त्या रूममधून. मी बाकड्यावर बसले होते. मला काही माहीत नव्हतं. ते आले. त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, डॉक्टरांनी असं असं सांगितलं आहे. आपण किडनी मिळवून देऊ. काही हरकत नाही. भावाची किडनी चालते. दलवाईंना सख्खा भाऊ नव्हता आणि किडनी घातली तरी जुळली पाहिजे
मी भरून पावले आहे : ९५