हमीद दलवाई आणि मी दोघं 'सत्यकथेत एकाच सुमारास लिहीत होतो. त्या वेळी असं होतं की 'सत्यकथे'त लिहितो ना, मग तो माणूस आपला. असे किती तरी लेखक लेखिका केवळ याच नात्यामुळे आमच्या घरी येऊन दिलखुलास गप्पा मारून गेले आहेत. 'सत्यकथे'च्या या नात्यामुळेच दलवाई आणि आम्ही दोघं यांत आत्मीयता निर्माण झाली. ते डेक्कन कॉलेजवरच्या आमच्या घरी यायचे, क्वचित राहायचेही. नंतरही आमच्या पुण्यातल्या सगळ्याच बिऱ्हाडांतून येऊन गेले. शेवटच्या भेटीत डायलिसिससाठी हातावर केलेला शिरांचा धकाकणारा जोड मुद्दाम दाखवून गेले, तेही हसतहसत.
काय गप्पा मारत होतो आम्ही भेटत होतो तेव्हा? काहीही आठवत नाही. आठवतो तो त्यांच्या त्या सुप्रसिद्ध लकबींसह बोलण्याचा उत्साह. मुसलमानांची आर्थिक स्थिती सुधारली तर जातीय तणाव खूप कमी होतील असं त्यांचं एक मत आठवतं. पण असं फारच थोडं आठवतंय. आता नव्या संदर्भात उमगतंय की पैशाची एवढी ओढाताण असताना त्यांनी ती कधी दर्शवलीही नाही, मग हात पसरून याचना करणं तर दूरच.
पुढं ते समाजकारणात पडल्यावरही त्यांच्या काही सभांना मी गेले होते, त्यांच्या स्नेहभावाचा अनुभव घेतला होता. त्यांच्या स्पष्ट-स्पष्ट बोलण्यामुळे ते जातवाल्यांचा रोष ओढवून घेणार हे मी बोलूनही दाखवलं. तो तसा त्यांनी ओढवून घेतला आणि निर्भयपणे ते त्याला सामोरे गेले - आपल्या जमातीवरचं प्रेम किंचितही ढळू न देता - हे आता सर्वांना माहीत आहेच.
आपल्या नवपरिणीत पत्नीलाही दलवाई दोन-तीनदा आमच्याकडे घेऊन आले होते. त्या वेळी अबोल साक्षीदाराच्या भूमिकेतून मेहरुन्निसाबाई वावरल्या असं आता आठवतं. पण ते साक्षित्व किती सूक्ष्म निरीक्षण करणारं होतं याचा आता झालेल्या त्यांच्या गप्पांत प्रत्यय आला!
पान:मी भरून पावले आहे.pdf/11
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
या बोलपुस्तकाची जन्मकथा