पान:मी भरून पावले आहे.pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मी फार घाबरून गेले असं नाही. का तर संयम कुणाला तरी ठेवावा लागतो. आणि माझ्यात तो होता. मी पहिल्यापासून लेचीपेची, घाबरणारी अशी नव्हते. स्वतः दलवाई पण तसे नव्हते. मग नंतर डॉ. गोखल्यांना फोन केला. डॉ. गोखले म्हणाले की भाटियामध्ये ॲडमिट करू या. भाटियामध्ये ॲडमिट करण्याआधी आम्ही डॉ. गोखल्यांकडे त्यांना नेलं. तिथं त्यांनी दलवाईंना तपासलं. औषध दिलं, लघवी तपासली. तिथं लॅबोरेटरीमधील माणसं बदलली असल्यामुळे रिपोर्ट चुकीचा आला. लघवीमध्ये युरिया असूनसुद्धा रिपोर्टमध्ये आलं नाही. म्हणून थोडासा घोळ झाला. पण ती नवी माणसं होती म्हणून आम्ही डॉक्टरला काही दोष दिला नाही. डॉक्टर खूपच चांगले होते. लहानपणापासून ह्यांना बघत होते. त्यांच्यावर आमचा काहीच संशय नव्हता. शिवाय भाटिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यामुळेच अॅडमिट झालो. जनरल वॉर्ड मिळाला. कारण स्पेशल वॉर्डमध्ये जागाच नव्हती. जनरल वॉर्ड मिळाला तर तो पुरुषांचा वॉर्ड, त्यामुळे मला रात्रीचं रहाता यायचं नाही. दिवसभर मी रहायची, मग रात्री महंमद दलवाई रहायचे. नाही तर हुसेनशेठ रहायचे, नाही तर महंमददांचा भाऊ अमीर रहायचा आणि मी सकाळी जायची. तसं ते हॉस्पिटल चांगलं होतं. डॉक्टर चांगले होते. औषधं चांगली होती. पण दलवाईंच्यावर त्याचा काही परिणाम होईना. सुधारणा होईना. आणि माझेसुद्धा असे हाल झाले की दिवसभरात मला रिलीव्ह करायला कोणी नव्हतं. माझ्या घरातलं असं कोणी नव्हतं. म्हणजे जे यायचे ते संध्याकाळी यायचे. थोडा वेळ बसायचे आणि निघून जायचे. शहासाहेबांनी काही लोकांना सांगितलं होतं, की भाभीला त्रास होतो. दुपारी कोणी बसत जा. पण कोणाला ते जमलं नाही. मला पण त्रास व्हायला लागला. मला रात्रीचे अकरा व्हायचे घरी जायला. त्यांचं सगळं आटपल्याखेरीज मी घरी जाऊ शकत नसे. भाटियामध्ये वीस दिवस राहिले. पण काही उपयोग झाला नाही. रोज शहासाहेबांना रिपोर्ट द्यायचा. शहासाहेब रोज यायचे भेटायला. नगरकरांना सांगायचे.

 लघवी यांना चांगली होत होती. पण लघवी जास्त होते की कमी होते यावर किडनीचं काम कसं आहे हे ठरवता येत नाही. काही लोकांच्या तर दोन्ही किडन्या खराब झालेल्या असतात, तरी त्यांना लघवी चांगली होते. पण जे युरिया नावाचे विष लघवीद्वारे बाहेर पडायला पाहिजे ते पडत नाही. तेव्हा लघवीवरनं काही कळत नाही. किंवा आपण म्हणतो की पाणी नाही पीत म्हणून किडनी बिघडते. असंही काही नसतं. त्यानंतर वीस दिवस झाले तरी त्यांची तब्येत सुधारेना.

९४ : मी भरून पावले आहे