मग इथल्या २०० पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन इथून गेले तिकडे. तिथं मग काही लोकांनी मिळून त्यांचा मोठा सत्कार केला. नि तो वाद मिटला मिरजोळीला.
पहिलं ‘लाट' पुस्तकं निघालं ना तेव्हाही त्याच्यावर असाच वाद झाला. त्यात 'कफनचोर' गोष्ट होती. हमीदखाननी वाटेल ते लिहिलेलं आहे असं म्हणून खूप वाद झाला. त्याच्यावर बहिष्कार वगैरे टाकला. आपल्या समाजाच्या विरुद्ध लिहितोय. खोटी गोष्ट आहे. कोण असा कफन चोरी करणार आहे!' अहो सगळ्यांकडे सगळं चालत असतं. पण काय खरं म्हटलं तर हिस्टॉरिकल फॅक्टस् नको असतात लोकांना. फॅक्टस् तुम्ही जर सांगायला गेलात तर त्याचा वाद होतो. पण आपण ते बोल्डली लिहिलं पाहिजे ना, की हे असं घडतं म्हणून. त्या पुस्तकावर खूप वाद झाला. 'लाट'सुद्धा खूप गाजली तेव्हा. सगळे म्हणाले, त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत्या. चांगल्या समजल्या गेल्या आहेत. नंतर दलवाईंनी साधना, सत्यकथा, मराठवाडा, माणूसमध्ये आणखी लिहिलं. पुष्कळ अजून गोष्टी आहेत. त्यांचं संकलन करायला पाहिजे. साधनामध्ये खूप आलेलं आहे. लाट हे तर छोटंसं पुस्तक १३ गोष्टीचं. तेवढ्याच मिळालेल्या आहेत.
वर्ष आठवत नाही. पण मुस्लिम पर्सनल लॉ वर दुसरा मोर्चा झाला. ऑल इंडिया लेव्हलवर मुंबईच्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये गुप्त मीटिंग घेतलेली होती मुस्लिमांची. तिथं फोटोग्राफर्स, रिपोर्टर्स अलाऊड नव्हते. मुसलमानांनी घेतलेली मीटिंग हो. त्यामध्ये दलवाईंना बंदी. त्यामुळं आमची माणसं गुप्तपणे आत शिरू शकली नाहीत. काही ठिकाणी मीटिंगमध्ये आमची माणसं अशी गुप्तपणे जाऊन रिपोर्ट आणत असत. त्या वेळी हे झालं नाही. त्या मीटिंगला प्रोटेस्ट म्हणून आम्ही मोर्चा काढला... बॉम्बे सेंट्रलला एस.टी.चा डेपो आहे. त्याच्याजवळच बी.ई.एस.टी.चा डेपो आहे. मग महाराष्ट्र कॉलेज आहे. एस.टी.च्या डेपोच्या बाहेर सगळ्यांनी जमा व्हायचं... युवादलाची काही मुलं होती. राष्ट्र सेवा दलाची काही आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाची काही होती. तर याच्यामध्ये २५ जण होतो. बायका थोड्याच होत्या. बायकांचा संबंध तिथं नव्हता. प्रोटेस्ट म्हणजे बायकांच्यासाठी नव्हता. तो मोर्चा काढायचा होता प्रोटेस्ट म्हणून, त्याच्यात आम्ही दोन-तीनच बायका होतो. मी आणि अॅडव्होकेट नजमा होती. एक-दोन अजून बायका होत्या. तर आम्ही तिथं जमा झालो. दुपारपर्यंत, मोर्चाला ये, असं यांनी मला सांगितलं नाही. मोर्चा आहे असं मला माहिती होतं. आमच्याकडे सगळे जमा झाले, जेवणं झाली, सगळे निघाले तेव्हा हे मला म्हणाले, 'असा असा मोर्चा आहे.
मी भरून पावले आहे : ८५