पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हसून दाखवलं, ३०० रुपये भाव मागतात काय? वेडे काय? कोणी लेख लिहायला लागला, '१७५ म्हणजे फार झाले. ३०० रुपये म्हणजे काय वाट्टेल ते मागतात!'
 आपण ३०० रुपये भाव मिळवून दाखविला. निफाड सहकारी साखर कारखाना आपल्या जवळचा आहे. ३० जून १९८१ ला साखरेची जी परिस्थिती होती ती पाहता १२ टक्के साखर उताऱ्याकरिता इथल्या शेतकऱ्याला उसाला प्रतिटन ३६७ रुपये भाव मिळाला असता. हे लोक गेल्या वर्षी सांगत होते की ३०० रुपये भाव शक्यच नाही, आपण ३६७ रुपये मिळवून दाखवला.
 कांद्याची खरेदी ६० ते ७५ रुपये क्विटलच्या भावाने झाली. गेल्या सात वर्षांत कपाशीला भाव वाढवून मिळाला नव्हता तो आंदोलनामुळे यंदा क्विंटलमागे १३० रुपये वाढवून मिळाला आणि क्विंटलमागे ५० रुपये बोनसही मिळणार आहे.
 तंबाखूची परिस्थितीही अशीच

 गेल्या वर्षी निपाणीच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले होते. आपल्याला वाटते की शेतकऱ्यांचे आंदोलन नाशिक आणि पुण्यातच होते. १९७८ साली निपाणीच्या शेतकऱ्यांनी पुणे-बंगलोर रस्ता अडवून धरला होता. त्यात भाग घेतलेले कार्यकर्ते येथे हजर आहेत. तंबाखूचा भाव बाजारात किलोला ५-६ रुपये होता, शेतकऱ्यांनी मागितला होता किलोला १० ते १२ रुपये. सरकारने सत्याग्रहाच्या पुढाऱ्यांना दिल्लीला बोलावून घेतले. बाजारात भाव ५ ते ६ रुपये, शेतकरी मागतात १० ते १२ रुपये आणि सरकारने दिल्लीहून भाव किती जाहीर केला? कोणाचा कानावर विश्वासही बसणार नाही, सरकारने जाहीर केला १ रु. ते १ रुपये ४० पैसे! आज याच तंबाखूला शेतकरी, अगदी भिजका तंबाखू असला तरी, दर किलोला ३ रुपये उचल घेऊन राहिला आहे. चांगल्या तंबाखूला १२ रुपयांपर्यंत उचल घेऊन विक्रीनंतर येईल तो बोनस मिळणार. आता तंबाखूचे वजन करताना त्यातून काडीसूट, मातीसूट, हवासूट अशी कोणतीही वजावट केली जात नाही. आजपर्यंत तंबाखूउत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती अशी होती की तंबाखूखरेदीनंतर व्यापारी सगळे पैसे सहसा देत नसत. वर व्यापाऱ्याने शेतकऱ्याचे पैसे सगळे दिले नसले आणि जर हजार दोन हजार रुपये शेतकऱ्याचे व्यापाऱ्याकडे राहिले असतील 'तुझे पैसे सांभाळायला खर्च येतो' म्हणून तो खर्च व्यापारी शेतकऱ्याच्या माथी मारत असे; पण व्यापाऱ्याकडून जर शेतकऱ्याने काही अधिकचे पैसे घेतले तर मात्र त्याचे व्याज द्यावे लागे. अशा तऱ्हेने, छापा पडो की काटा, दोन्ही बाजूने शेतकरी मेलाच!

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ९