आणि तीमुळे येणाऱ्या नव्या संकटावर काय उपाययोजना करायला पाहिजे त्याबद्दल तुम्हाला काही सल्ला देणे. हा साप पुन्हा आपला फणा काढू पाहत असेल तर त्याला कसा ठेचायचा हे आपल्याला एकमताने ठरवायचे आहे. तुम्हाला सल्ला देण्याचा अधिकार मला आहे असे मी समजतो कारण गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात, विदर्भात, मराठवाड्यात महाराष्ट्रभर आम्ही सगळे फिरलो. माधवराव खंडेरावांनी सगळ्यांना सांगितले, "गेली तीस वर्षे तुमच्याकडे सगळे पुढारी येऊन गेले. त्यांनी तुम्हाला काय काय सांगितलं आणि तुम्ही वेड्यासारखं ऐकलं. शेतकरी संघटनेचा जो कार्यक्रम आहे - शेतीमालाला रास्त भाव - फक्त एककलमी कार्यक्रम-त्याला फक्त एक वर्ष तुम्ही वापरून बघा. जर का हा कार्यक्रम तुम्हाला पटला तर कार्यक्रमात राहा नाही तर तुम्ही आपले नेहमीप्रमाणे आपापल्या पुढाऱ्यांच्या मागे जा."
हा कार्यक्रम आपण गेल्या वर्षी राबवला; लाठ्या झेलून राबवला, गोळ्या खाऊन राबवला. आजच्या या सभेत समोर बसलेल्यांपैकी जवळ जवळ पंचवीसतीस हजार शेतकरी तुरुंगात जाऊन आले. हा कार्यक्रम राबविल्यामुळे लाठीमार, गोळीबार, तुरुंगवास यांना सामोरे जावे लागूनसुद्धा आज ज्या प्रचंड संख्येने आपण इथे पिंपळगावात जमा झाला आहात ती तुम्ही शेतकरी संघटनेला दिलेली पावती मानतो की, "तुमचा हा एककलमी कार्यक्रम आम्हाला पटला, शेतकरी संघटनेच्या मागे यायला आम्ही तयार आहोत."
गेल्या वर्षीची आंदोलने - चाकणमधील कांद्याचे, नाशिक-धुळ्यामधील कांदा आणि उसाचे त्याच्याबरोबर विदर्भातील कपाशीचे आणि निपाणीतील तंबाखूचे - यांनी सबंध देश इतका हलून गेला की, कोणी उठून ८०-९० कोटी रुपये खर्च करून दिल्लीला शेतकऱ्यांचा मेळावा भरविला. जायला गाडी फुकट, बस फुकट, ट्रक फुकट; तेथे राहण्याची सोय फुकट, वरून काही पैसेही फुकट ! या देशात शेतकऱ्यांचा भाव इतका कधीच वाढला नव्हता. मला कोणीतरी विचारले, 'मेळावा कसा झाला? तुमचे काय मत आहे?' मी त्यांना सांगितले, 'हा मेळावा झाला, कोट्यवधी रुपये खर्चुन झाला; हा मेळावा म्हणजे जी मंडळी आपल्या शेतीमालाच्या रास्त भावासाठी मुंबई-आग्रा हमरस्त्यावर बसून राहिली, रेल्वेच्या रूळांवर बसून राहिली त्यांना सरकारने ठोकलेला सलाम आहे.'
सलाम बरा होता, थोडं गोड वाटलं; पण सरकार काही गप्प बसून राहिलेले नव्हते. शेतकऱ्यांनी आपल्याला नमवले असे त्याच्या मनाला टोचून राहिले होते.
शेतकऱ्यांनी उसाला टनाला ३०० रुपये भाव मागितला तेव्हा या लोकांनी