पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकरी मोकळा होतो. शेतकऱ्यांच्या हाती ॲटमबॉम्ब आला आहे.
 तर मग ९० सालच्या आधी तयारी काय कराची ते महत्त्वाचं आहे. यंदा मी तुम्हाला दिवाळीनंतर गावं रंगवायला सांगितली नव्हती. पण आपली जुनी पद्धत आहे. गावामधल्या सगळ्या भिंती शेतकरी संघटनेच्या घोषणांनी रंगवून टाका. हे फार महत्त्वाचं आहे. दिवाळीच्या आधी आपण रंगसफेदी करतो कारण शुभदिवस यायचा आहे. तर बळिराजाच्या आगमनाकरिता सगळं गाव शेतकरी संघटनेच्या आणि बळिराजाच्या विजयाच्या घोषणांनी रंगवून टाका.
 दसरी गोष्ट, गावाबाहेर शेतकरी संघटनेचा मोठा बिल्ला लावा. प्रत्येक गावामध्ये एक लहानशी का होईना पण पाटी लावून टाका. आपण पूर्वी पाटी काय लावायचो? कर्जवसुली अधिकाऱ्यांना आणि पुढाऱ्यांना गावात यायची परवानगी नाही. आता पुढाऱ्यांची चिंता करू नका व कर्जवुसली अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टानेच टांगून ठेवलं आहे. आता नवी पाटी लावा.. 'जातीयवाद्यांना या गावात प्रवेश नाही.' जातीच्या आधाराने धर्माच्या आधाराने माणसामाणसामध्ये झगडे लावणाऱ्यांना या गावात प्रवेश नाही.
 दुसरं काय काम करायचं आहे आपल्याला पाडव्याच्या मुहूर्तावर? ६ एप्रिल हा दिवस असा की, त्या दिवशी निपाणीला २३ दिवस सत्याग्रह झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबार करून तेरा शेतकऱ्यांना ठार केलं. महत्त्वाचा पवित्र दिवस आहे. त्या दिवसांपासून नवीन काम सुरू करायचं. नोकरशाहीवर वचक आणण्याकरिता, भ्रष्टाचार संपविण्याकरिता. नांदेड जवळच्या अहमदपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम केला. पंजाबातील बहाद्दर शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. काय कार्यक्रम यशस्वी केला?
 आपल्याला जागोजाग लाच द्यावी लागते. ७/१२ चा उतारा तुम्हाला पैसे दिल्याखेरीज कधी मिळालाय का? नाही. फॉरेस्ट खात्यात जाऊन एखादा कागद मिळवायचा आहे. पैसे दिल्याखेरीज मिळालाय का? कधीही नाही. विजेचे कनेक्शन मिळवायचं, नवीन स्टार्टर बसवायचं आहे; शेतकऱ्याचं कोणतही काम कुठंतरी वजन ठेवल्याखेरीज, कणाचे तरी हात ओले केल्याखेरीज होतच नाही, ही फार जुनी पद्धत आहे. शेतकऱ्याने शहरात कणाला भेटायला यायचं झालं तर त्या शहरातल्या माणसांकरिता काहीतरी बांधून आणायचं. निदान दोन किलो ज्वारी तरी बांधून आणायची आणि शहरातला मनुष्य खेड्यात आलातर मग शहरातला मनुष्य काही शहरातनं एखादी गोष्ट बांधून नाही आणत. तो खेड्यात आल्यानंतर शेतकऱ्यालाच विचारतो, 'काही हुरडा-बिरडा आहे की नाही शेतावरती?' म्हणजे शेतकरी भेटायला गेला तरी त्यानेच घेऊन जायचं

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३२