पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खरिपाच्या हंगामात काय करायचे? खरिपाच्या हंगामात आपण आपल्या पिकांचं नियोजन करायचं आहे. उगीच वेड्यासारखं महामूर धान्य पिकवायचं नाही. अन्नधान्य पिकवायचं आहे, पण किती? आपल्याला, आपल्या शेतावर काम करणाऱ्यांना, आपल्या भावाला पुरेल इतकेच धान्य यंदा आपण पिकवायचं आहे. शेजारच्या गावात कमी पडत असेल तर त्यांना पुरवायचे पण कोणत्याही परिस्थितीत धान्य बाजारात आणायचे नाही. अधिक धान्य पिकवलं तर आपण अधिक कर्जात बुडतो, खड्ड्यात जातो याचा अनुभव आपल्याला वर्षानुवर्षे आला आहे. त्यामागील आर्थिक कारणही आता आपल्या लक्षात आले आहे. तेव्हा किमान एक वर्ष हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे.
  एखाद्या कारखान्यात प्रचंड यंत्रसामग्री असेल आणि त्यात एका दिवशी दहा हजार वस्तू तयार होत असतील तर मागणी कमी म्हणून जर त्याला किफायतशीर भाव मिळाला नाही तर त्याचं दिवाळं वाजेल. त्यापेक्षा कारखानदार म्हणेल हजारचीच मागणी आहे ना, मग मी हजारच वस्तू तयार करीन आणि किफायतशीर दरात विकीन, राहिनात का काही यंत्र बंद. यालाच शहाणा कारखानदार म्हणतात. शेती व्यवसाय हाही एक कारखानाच आहे. आपले यंत्र फार मोठे आहे. तरीसुद्धा बाजारात किफायतशीर दरात मागणी नसेल तर आम्ही अधिक धान्य पिकवन अधिक नकसानीत जायला आता तयार नाही
 काही लोक तुम्हाला सांगायला येतील की असे करणे चुकीचे आहे. यात देशाचे नुकसान आहे; देशाला अधिक धान्य पिकविण्याची गरज आहे. त्यांना आपण सांगायला पाहिजे, 'अधिक धान्य पिकवायला आम्ही तयार आहोत. आम्ही अधिक धान्य पिकवावे अशी जर तुमची इच्छा असेल तर अन्नधान्याला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव मिळण्याची व्यवस्था करा. आम्ही तर आजपर्यंत धान्याचे डोंगर घालून दिलेत पण तुमचं धोरण आणि किमती पाहता आम्ही अधिक धान्य पिकवू नये अशीच तुमची इच्छा आहे असे दिसते.
 'रब्बीचा हंगाम तर संपत आला आहे. या हंगामात तयार झालेले अन्नधान्य आपण बाजारात बिलकल आणायचे नाही. खरीप हंगामात मात्र योजनाबद्ध आखणी केली पाहिजे. आपल्या या कारखान्याचं यंत्र कसं वापरायचं? आपल्या शेतीचा विचार करा. आपल्या सर्व जमिनीत ज्वारी, बाजरी वगैरे धान्य काढण्याचे थांबवा. आपल्या गावापुरते धान्य तयार होईल इतक्याच जमिनीत धान्यपिकांची लागवड करा. उरलेल्या जमिनीत आपापल्या भागातील हवामान, पाऊसमान यांचा विचार करून फळबागा तयार करा. कडधान्य तयार करा, गळिताचे धान्य घ्या. काही जमीन वनशेतीसाठी ठेवून झाडांची लागवड करा.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २८