पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. आपल्या मालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेपर्यंत आपण आपला माल विकायचा नाही असे सर्व शेतकऱ्यांनी मिळून ठरविले पाहिजे. हे या आधीही जमले असते. पण प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात भीती की आपण नाही विकलं तर दुसरा विकील; आपला माल तसाच पडून राहील; आपलं नुकसान होईल. कणी एकानं सांगावं आणि सर्व ५२ कोटी शेतकऱ्यांनी ऐकावं अशा विश्वासाचं कणी नव्हतंच. गेल्या चार वर्षांत आपण सर्वांनी सर्व देशभर हिंडून शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन अशी वेगवेगळ्या भाषांतील नावं धारण करून अशी एक संघटना तयार केली आहे जिच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहील.
  १९८४ मध्ये आपल्याला हे हत्यार वापरावयाचे आहे. यावर्षी आपण बाजारात धान्य अजिबात आणावयाचे नाही. या कार्यक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे यंदा रबी हंगामाचे जे पीक हाती आले आहे ते अजिबात बाजारात आणायचे नाही. आता आपल्याला आपली ताकद दाखविणे आवश्यक आहे. आपल्याला त्यांना ठणकावून सांगायला हवे, 'हमसे जो टकरायेगा, भूकसे मर जायेगा।' कारण आपली स्थिती शेषनागासारखी आहे. त्याच्या डोक्यावर सगळ्या पृथ्वीचा भार आहे. पण या शेषनागाने आज ठरविले आहे की अशा त-हेने आम्हाला ठेचू पाहत असाल तर आता आम्ही हा भार वाहायला तयार नाहीत. ही पृथ्वी आता हलायला लागणार आहे.
 धान्य बाजारात न आणण्याच्या आपल्या या आंदोलनाची प्रत्यक्षात सुरुवात १५ एप्रिलपासून पंजाब व हरियानात होणार आहे. भारतीय बाजारपेठेत येणाऱ्या गव्हातील ७०% गहू या राज्यात बनतो. तेथील शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे की एक कणसुद्धा गहू बाजारात येणार नाही. शासनाला किती गहू अमेरिकेतून आणायचा असेल तितका आणा म्हणावे! शासन याबाबतीत कोंडीत सापडणार आहे. कारण यावर्षी शासनाला जागतिक बँकेचे कर्ज फेडायचे आहे.
 अन्नधान्य बाजारात पाठविणे बंद करणे ही तशी कठीण गोष्ट आहे हे मला माहित आहे; पण आपण स्वराज्य मिळवायला निघालो आहोत ना? आपल्याला काय कणी खाटेवर झोपल्या झोपल्या स्वराज्य देणार आहे? त्यासाठी थोडाफार त्रास सहन करावाच लागेल. रब्बी हंगामात तयार झालेले धान्य बाजारात आणायचं नाही ही आपल्या या वर्षीच्या कार्यक्रमाची छोटीशी सुरुवात आहे. मुख्य लढाई पुढेच आणि लांब आहे. ८४ साल आता कठे सुरू झाले आहे. खरा कार्यक्रम खरिपाच्या हंगामात आपल्याला राबवायचा आहे-आखीवपणे, शिस्तबद्धरीतीने आणि प्रामाणिकपणे.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २७