पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




सौराज्य मिळवायचं औन्दा



 गेली दोन वर्षे शेतकरी संघटना संघटनेच्या विचार प्रसावरच भर देऊन कार्य करीत आहे. दोन वर्षांत शेतकऱ्यांवर बरेच अन्याय झाले आहेत. कांद्याची खरेदी बंद करण्यात आली, उसाच्या किमती पडल्या, तंबाखू तर साफ ठार झाली आणि तरीसुद्धा शेतकरी संघटनेने मोठ्या आंदोलनाचे नाव काढले नाही. याचा अर्थ असा नव्हे, की शेतकऱ्यांवर अन्याय होतो याची संघटनेला कल्पना नव्हती. शेतकरी संघटनेच्या रणनीतीचे एक महत्त्वाचे तंत्र आहे. ज्यावेळी अन्याय होतो म्हणून चीड येते, संताप होतो त्यावेळी वरचा ओठ दातांनी दाबून धरायचा आणि सगळा संताप गिळून पोटात घालायचा असतो. आंदोलन अशाच वेळी करायचे जेव्हा आपली आंदोलन करण्याची ताकद असते. आपल्या ताकदीचा अंदाज घेऊनच आंदोलनाची वेळ ठरविली पाहिजे.
 अफझुलखान विजापुराहून निघाल्यापासून त्याच्या फौजेने गावोगाव जाळपोळ, लुटालूट, अत्याचारांचा कळस केला. या सगळ्यांची वर्दी छत्रपतींच्या कानी जात होती. त्यांनाही याची चीड आली नसेल, त्यांचा संताप झाला नसेल असे नाही. आपलं सैन्य किती का थोडं असेना, अफझूलखानाची फौज किती का प्रचंड असेना आपण त्यांच्यावर तुटून पडावं असं त्यांनाही वाटलं असणार. पण त्यांनी तसं केलं नाही. अगदी कुलस्वामिनी भवानीचे तुळजापूरचे देऊळ अफझूलखानाच्या सैन्याने लुटलं तरी महाराज स्वस्थ बसले. त्याला आपल्या राज्यात अगदी प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊ दिलं. तोपर्यंत सैन्याची जमवाजमव केली आणि मग हल्ला केला. पुढे घडलेला इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.
 आपला शत्रू अफझूलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन बसला आहे. "सौराज्य मिळवायचं औंदा." तेव्हा आता लढाईला तयार व्हा. आजपर्यंत सगळा संताप जो पोटात साठवला होता त्यानं नुसतं भडकून उठून उपयोगाचं नाही. हृदयात आग असली तरी डोकं शांत ठेवून आपल्याला ही लढाई लढायची आहे. डोकं भडकलं म्हणून रजपुतांसारखा 'केसरिया' करण्यात अर्थ नाही.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २५