पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुख्यमंत्री निधीसाठी. मला मोठा प्रश्न पडतो की आमचे अध्यक्ष शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून परस्पर कपात करून धावतपळत हा चेक घेऊन का गेले? मागच्या वर्षी माधवराव (तात्या) बोरस्ते साखर संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ठराव झाला की उसाच्या भावासाठी झालेल्या लढ्यात जे शेतकरी हुतात्मा झाले, ज्यांनी आपले प्राण वेचले त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी उसाच्या टनामागे ५ पैसे द्यावे. किती कारखान्यांचे अध्यक्ष पैसे पाठवायला तयार झाले? जेमतेम आठ? अरे, शेतकऱ्यांच्या पोरांनी जीव टाकले, त्यांच्यासाठी ५ पैसे मागितले तर जी मंडळी धावत आली नाही ती, अंतुल्यांनी युऽ युऽ म्हणताच चेक घेऊन धावत सुटली! काय म्हणावे? कोणी २५ लाख दिले, कोणी ३० लाख. रेडिओवर बातम्या, टीव्हीवर फोटोसहित बातम्या.
 काही लोकांच्या मनात गैरसमजूत असेल की हे अध्यक्ष त्यांच्या मनात नसताना, कळत न कळत गेले असतील. पण त्यांनी मोठी युक्ती केली. अंतुल्यांनी पैसे मागताच साखर संघाने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून प्रति टन २ रुपये ५० पैसे कपातीचा ठराव केला आणि तो राज्याच्या साखर संचालकांकडे पाठवून दिला. साखरसंचालकांनी सगळ्या कारखान्यांना पत्र लिहिले की, 'टनामागे २ रुपये ५० पैसे द्यायचे ठरले आहे त्याला माझी परवानगी आहे' आणि मग सगळ्या अध्यक्षांनी 'साखरसंचालकच सांगत आहे पैसे कापा' असे म्हणत शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून पैसे कापले आणि अंतुल्यांकडे पोहोचते केले. या अध्यक्षांनी शेतकरी संघटनेविरुद्ध गुन्हा केला आहे. काहीजणांच्या हातून कळत झाला असेल काहींच्या हातून न कळत झाला असेल इतकेच. गुन्हा कसा झाला?
 गेल्या वर्षी पिंपळगाव बसवंतला ऊसभावासाठी सभा झाली तेव्हा आणि मुंबईला महाराष्ट्र सरकारबरोबर आमच्या वाटाघाटी झाल्या तेव्हा शेतकरी संघटनेने जाहीर केले होते की, 'यंदा आम्हाला उसाला ३०० रुपये प्रतिटन भाव मिळेल असे दिसते आहे म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. तसा अजून आमचा खरा विजय झालेला नाही. उसाचा भाव ठरवताना वाहतुकीचा, साठवणुकीचा खर्च सरकार अजून विचारात घेत नाही. हा खर्च सरकार जोपर्यंत लक्षात घ्यायला तयार नाही तोपर्यंत ऊसबिलातून अशा कपाती करायला शेतकरी संघटना कबूल नाही.' त्यावेळी आम्ही असं जाहीर केले होते; पण नंतर सरकारला असे वाटायला लागले असेल की आता शेतकरी संघटना दमली; आता अध्यक्षांच्या शेपट्या पिरगाळल्याबरोबर टनामागे अडीच रुपये मिळतील.

 काही का असेना, वाटाघाटीसाठी तयार असतात म्हणून आम्ही आजपर्यंत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७