कांद्याचे उत्पादन कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही सरकारला एक योजनाही लेखी द्यायला तयार आहोत. कांद्याचे आंदोलन करता येते कारण ते करणे सोयीचे आहे. ते सोयीचे आहे म्हणून आम्ही ते केले आणि सरकार असे वेडे की त्यांनी फक्त कांद्याचेच भाव वाढवून दिले. म्हणजे, आम्ही कुत्र्याला दगड मारला आणि कुत्रे गेले दगडाच्या मागे अशी गत झाली. कांद्याचे उत्पादन कमी व्हावे अशी सरकारची खरोखरीच इच्छा असेल तर कांद्याबरोबर सरकारने भुईमूग, हरभरा, मिरची इत्यादी इतर कोरडवाहू पिकांच्या किंमतीही बांधून दिल्या पाहिजेत. आज जर सरकारने भुईमुगाला ४५० रुपये, हरभऱ्याला ४०० रुपये आणि वाळलेल्या मिरचीला १००० रुपये भाव दर क्विटलला बांधून दिला तर शेतकरी कांदा आपोआपच कमी घेतील. या फेडरेशनकडे कांदा घेऊन जायचा म्हणजे शेतकऱ्याला मोठी डोकेदुखी आहे; पण इतर पिकांनाही भाव नाही त्यामुळे काही करता येत नाही म्हणून शेतकरी कांदा करतो. सरकारला कांद्याचे उत्पादन खरोखरी कमी करायचे असेल तर किमान या तीन पिकांना भाव बांधून मिळाले पाहिजेत.
पण, परिस्थिती अशी आहे की आम्ही भाताला (२५० रुपये), गाईच्या दुधाला (४ रुपये), म्हशीच्या दुधाला (५ रुपये), भुईमुगाला, हरभऱ्याला, मिरचीला भाव बांधून द्या म्हटले त्याला सरकारकडून काही प्रतिसाद नाही. मग, कांदा कमी करा असे नुसते ओरडून काय उपयोग? कांदा कमी कसा होणार? यांना शेतकऱ्याचे काम करायला वेळ नाही आणि दिल्लीच्या वाऱ्या करायला मात्र वेळ आहे. गावोगाव जाऊन 'आमचं सरकार गरिबांचं आहे', 'आम्ही गरिबांचं कल्याण करतो आहोत', 'आम्ही गरिबांसाठी पैसे गोळा करतो आहोत', इतरही काही अनेक गोष्टी करतो आहोत अशा टिमक्या वाजवून काय होणार?
उसाचा प्रश्न तर सर्वात भीषण आहे. ३० जून १९८१ रोजी निफाड सहकारी साखर कारखाना उसाला ३६० रुपयांचा अंतिम भाव जाहीर करील असे वाटले होते. प्रल्हाद पाटलांनी सकाळी सांगितले की तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज कारखान्यात ४२२ रुपयांपर्यंत भाव मिळण्यासारखी परिस्थिती आहे. पण शेतकऱ्यांना भाव मिळू नये म्हणून सरकारने मोठा डाव टाकला. पहिली गोष्ट सरकारने केली ती म्हणजे सगळ्या साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या शेपट्या पिरगाळल्या. या अध्यक्षांची आणि संचालकांची, काही तुरळक अपवाद वगळता, इतकी लफडी असतात की त्यांच्या शेपट्या पिरगाळणे सोपे असते. आपणसुद्धा आपला उसाचा बांधावरचा लढा उभारताना याच अध्यक्षांच्या शेपट्या पिरगाळल्या होत्या. तर, अंतुल्यांनी काय केले? त्यांनी फर्मान सोडले की, काढा इतके इतके रुपये