पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शेतकरी संघटनेच्या निपाणी आंदोलनानंतर आता तिथे शेतकरी आपल्या तंबाखूचे पैसे वाजवून घेतो आहे. निपाणी परिसरातील शेतकऱ्यांची मला पत्रे आली आहेत, की शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे पंधरा-पंधरा वर्षांची दहा-दहा, बारा-बारा हजारांची कर्जे आता आम्ही पार फेडून टाकली आहेत. एका शेतकऱ्याने तर मला लिहिले आहे की, 'माझ्या मुलीचे लग्न तीन वर्षांपासून होत नव्हते, आज मी तिचे थाटाने लग्न केले; केवळ शेतकरी आंदोलनामुळे हे शक्य झाले.'
 एवढे लांब कशाला जायला पाहिजे? माझ्याआधी बोलताना माधवराव म्हणाले की, 'आमचा हा निफाड तालुका, केवढी सुपीक जमीन, धरणांचे पाणी पाच कालव्यांनी सगळ्यांना मिळते; पण इथला एकतरी शेतकरी असा दाखवा की ज्याने सर्व कर्ज आणि सोसायटी फेडली आणि मग मेला. आजपर्यंत असा एकही शेतकरी झाला नाही; पण उसाला भाव मिळाल्यामुळे यंदा सगळ्यांनी सोसायट्या फेडल्या, बऱ्याच जणांच्या निल झाल्या.'
 अशा सर्व आनंदाच्या वातावरणात आपण गेल्या वेळी भेटलो. पावसाळा आला, कुठे कमी पाऊस झाला, कुठे जास्त पाऊस झाला. आपली ही नेहमीचीच रडकथा आहे. पण पावसानं इतकं मारलं नाही हो! सरकारने जितके आज आम्हाला मारायला काढले आहे तितका पाऊस कधीच मारणार नाही. गेल्या वर्षीच्या आंदोलनांचा अभ्यास सरकारने फार काळजीपूर्वक केला. सगळे शेतकरी उठतात आणि भाव मागून घेतात हे त्यांनी पाहिले. तुम्ही शेतकऱ्यांनीच माझी भाषणे ऐकली असे नाही, तुम्हीच माधवरावांची, प्रल्हादरावांची भाषणे ऐकली असे नाही; आज जसे दोनचार ठिकाणी टेपरेकॉर्डर लावून बसले आहेत तसेच सरकारी लोक गेल्या वर्षीही बसले होतेच. सरकारने ती सगळी भाषणे मोठ्या काळजीपूर्वक ऐकली आहेत.
 गेल्या वर्षी आंदोलनाच्या आधी सरकारने सांगितले होते की २३ ऑक्टोबरपर्यंत साखर कारखाने चालू करावेत, शेतकऱ्यांनी त्यांना ऊस घालावा. तेव्हा आम्ही म्हणत होतो की उसाला भाव पाहिजे ना मग फक्त १५ नोव्हेंबरपर्यंत ऊस घालायचे थांबा. फक्त तीन आठवडे. तीन आठवड्यांत कोणाचाही ऊस जळून जाणार नाही आणि तीन आठवडे जर कारखाने चालू झाले नाहीत तर साखरेचा इतका तुटवडा येणार आहे की बाजारातील साखरेची किंमत किलोला ५० रुपये होईल आणि सरकारला तुमची मागणी मान्य करावी लागेल.

 दिल्लीतील लोकांनी हे बरोबर ऐकले आणि यंदा त्यांनी किती चोख व्यवस्था केली आहे पाहा. त्यांनी या गाळप हंगामाआधी जवळजवळ २१ लाख टन

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १०