पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठेवू नका.
 शिक्षकांचा संप झाला तर, मी माझ्या सगळ्या पाईकांना विनंती करतो की अशावेळी त्यांनी गावोगाव, आवश्यक वाटल्यास झाडाखाली शाळा भरवावी पण वीस वीस, चाळीस चाळीस हजारांची लाच देऊन नोकरी मिळविणाऱ्या शिक्षकांचा संप यशस्वी होऊ देऊ नका.
 महाराष्ट्रातील सरकारी नोकर संप करायला निघाले आहेत. शासनाशी आमचे काय रागलोभ असतील ते सोडून द्या. मी शासनाला शब्द देतो की, "जे काही लोक संपावर जातील त्यांच्या बदली प्रामाणिकपणे, काहीही पगार न घेता, स्वच्छ काम करण्याकरिता वाटेल तितकी आणि हव्या त्या स्तरावरची - तलाठ्यापासून ते मुख्य सचिवांपर्यंत - प्रत्येक जागेकरिता पात्र माणसं आमच्याकडे उपलब्ध आहेत."
 या झाल्या कार्यक्रमाच्या घोषणा. स्वातंत्र्य जाहीर केलं. काळ्या इंग्रजालासुद्धा आपण देशातून निघून जा सांगितलं, करा किंवा मरा म्हटलं, पण याची अंमलबजावणी कशी होणार आहे?
 अंमलबजाणीचे वेळापत्रक मी तुम्हाला सांगतो. आज ३१ ऑक्टोबर म्हणजे महिना संपला. आज कोजागरी पौर्णिमा म्हणजे उद्यापासून नवा पक्ष चालू होतो आहे. घरी गेल्यानंतर काय करायचं आहे ते लक्षात घ्या.
 तुमचं गाव जर या आपल्या नव्या बळिराज्यातलं गाव, स्वतंत्र होणारं गाव असलं तर त्या गावच्या वेशीवर पहिल्या प्रथम बळिराज्य गाव अशी शेतकरी संघटनेची पाटी लावा. येणाऱ्या जाणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे की हे स्वतंत्र झालेलं गाव आहे.
 ही बळिराज्याची पाटी लावण्याकरिता काय केलं पाहिजे?
 आपण चाललो स्वतंत्र व्हायला, पण तुमच्याकडून मीसुद्धा एक भीक मागणार आहे. तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल तर माझ्या मायबहिणींना, तुमच्या लक्ष्मीला गुलामीत ठेवून चालणार नाही. बळिराज्यात येण्यास लायक गाव कोणतं? ज्या गावात लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम होईल, म्हणजे निदान शंभर लोक आपल्या लक्ष्मीच्या नावाने जमीन करून देतील असं लक्ष्मीमुक्तीचं गाव आणि त्याबरोबर त्या गावातील दारूचं दुकान बंद झालं तरच मी त्याला बळिराज्याचं गाव म्हणेन; तरच माझ्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत त्या गावाची गणना होईल; एरवी नाही.
 या स्वतंत्र गावाने आपल्या स्वातंत्र्याचे हक्क बजावत असताना त्याला संरक्षण कोण देणार? या स्वतंत्र गावाने कर द्यायचा नाही म्हटलं तर सरकारी नोकरदारांपासून त्यांना संरक्षण कोण देणार? या गावाने विजेचं बिल द्यायचं नाही

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ९५