पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १) भूकंपाच्या नावाखाली आम्हाला लुटण्याचं बंद करा. गावामध्ये लक्षावधी रुपयांनी ज्यांची मिळकत आहे त्यांनी शंभरदोनशे रुपये दिले म्हणजे संपलं; पण ऊस शेतकऱ्यांकडून किती वसुली केली जाते आहे? एकदा तलाठ्याकडून, मग कलेक्टरकडून, मग शाळेच्या पोरांकडून, मग साखरेच्या कारखान्याकडून, मग आणखी कोण्या सहकारी संस्थेकडून. या ऊसउत्पादक शेतकऱ्यांकडून आज तुम्ही भूकंपग्रस्तांसाठी निधी घेऊन गेलात तर उद्या त्यांच्या भागात जर का भूकंप झाला तर त्यांच्या घरांच्या ढिगाऱ्यांखाली त्यांची तीच अवस्था होणार आहे. त्यांना पहिल्यांदा आपापली घरं बांधू द्या. असं सांगून ठराव करा की अशा कपाती आमच्या संमतीविना केलेल्या आम्हाला चालणार नाहीत.
 २) आणि दुसरा ठराव असा करा की, आमच्या सहकारी संस्था जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये बदला; सहकारी व्यवस्थेवर आता आमचा विश्वास नाही.
 जे जे बंधन आहे ते ते नाकारण्याचा, स्वतंत्र शेतकरी म्हणून तुम्हाला मी अधिकार देतो आहे. नोकरदार तुमच्या आड येणार आहे. त्याचा बीमोड कसा करायचा ते तुम्ही ठरवा.
 महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचा सगळा अजागळ कारभार. पण त्या अजागळपणाची किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे. तुमचं विजेचं बिल वाढणार आहे. महाराष्ट्र शासनानं महसूल वाढवायचा ठरवलं आहे. काही जिल्ह्यात दुप्पट, काही जिल्ह्यात तिप्पट तर काहीत साडेतीनपट. आपण सरकारला सांगितलं पाहिजे की हे सरकार आम्ही आर्थिक बाबतीत मानत नाही. तुमच्या घरी शिस्त लावा. नोकरदारांवर जी उधळपट्टी चालली आहे ती थांबवा. वीजबोर्डाची परिस्थिती अशी की जितके नोकरदार लागतात त्याच्या दुप्पट नोकरदार, कामाच्या मानाने जितका पगार मिळाला पाहिजे त्याच्या दुप्पट पगार आणि जितका पगार मिळतो त्याच्या दसपट वरकमाई. अशा वीजबोर्डाचं आम्ही काहीसुद्धा देणं लागत नाही.
 उद्यापासून सर्व शेतकऱ्यांनो विजेची बिलं भरणं बंद करा. सरकारचे कर भरणे बंद करा. बळिराज्याला विरोध करण्याकरिता नोकरदार संपावर जाणार आहेत. दोन नोव्हेंबरपासून बँकवाल्यांचा संप होणार होता; पण त्या आधीच सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या. जर पुन्हा कधी बँकांचा संप चालू झाला तर, शेतकरी संघटना इथून इशारा देते की,
 "एक दिवस जरी बँक, संपाच्या कारणाने बदं राहिली तरी त्या बँकेतील कर्ज-खाती शेतकरी पुरी करणार नाहीत. आपली सर्व खाती बंद करतील." राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये किंवा सहकारी सेवांमध्ये संप झाला तर सगळ्या शेतकऱ्यांनी तिथली खाती उचला, हवे तर पैसे घरी ठेवा पण या बँकांमध्ये, संस्थामध्ये खाती

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ९४