पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतीयांनी हिंदुस्थानात पैसे आणायला जी सुरुवात केली होती, ते पैसे त्यांनी परत काढून न्यायला सुरुवात केली. दुसरा एक परिणाम झाला. नवीन खुली अर्थव्यवस्था म्हणजे परदेशातून मालही यावा आणि भांडवलही यावे अशी अपेक्षा; पण आज हिंदुस्थानात निर्बंध आहेत. बाहेरून भांडवल आणता येत नाही, तंत्रज्ञान काही लोकांसाठीच येतं अशी जी नेहरूप्रणीत नियोजनाची व्यवस्था आहे ती बंद करून देशादेशांमधल्या भिंती तोडून टाकणं आणि खुली ये-जा ठेवणं याचाच अर्थ खुली अर्थव्यवस्था; याचाच अर्थ बळिराज्य. तुम्ही दरवाजे उघडले आणि बाहेरचं भांडवल येऊ द्या म्हटलं पण, बाहेरची माणसं म्हणू लागली की तुम्ही दरवाजे उघडले खरे पण तुमच्या दरवाजाच्या आत जे काही चाललं आहे त्यामुळे आमची काही आत येण्याची फारशी इच्छा होत नाही. अनेक परदेशी कारखानदारांनी हिंदुस्थानात भांडवल गुंतवण्याची तयारी दाखवली होती. नंतर, विशेषतः ६ डिसेंबरच्या दंग्यानंतर या देशात दंगे अशा तऱ्हेने होऊ शकतात, एवढंच नव्हे तर सरकार त्यांवर परिणामकारकरीत्या ताबा मिळवू शकत नाही हे पाहिल्यानंतर त्यातील काही निर्णय रद्द करण्यात आले, काही स्थगित करण्यात आले, काहींवर फेरवविचार चालू आहे म्हणून सांगण्यात आलं.
 पुढील घटना याबाबतीत पुरेशी बोलकी आहे. इंग्लंडमधील एका मोठ्या कंपनीने मुंबईमध्ये एक मोठा कारखाना काढण्याचं ठरवलं होतं. बोलणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ मुंबईला यायचं होतं. त्याचवेळी अयोध्येत मशीद पडली. मुंबईत दंगे वगैरे चालू झाले आणि लंडनमधल्या लोकांनी मुंबईतल्या संबंधितांना फोन करून सांगितलं की, "दंगे चालू आहेत तर आम्ही कसे काय येणार?" मुंबईतल्या लोकांनी म्हटलं की, "इतकं काही नाही. वर्तमानपत्रात फारच येतं. आम्ही नाही का इथंच राहात?" लंडनमधल्या लोकांनी त्यांना सांगितलं की, "असं असेल तर तुम्हीच लंडनला निघून या." हे बरं म्हणाले आणि घरातून निघाले तर विमानतळावर पोहोचायलाच त्यांना तीन दिवस लागले-दंगे, संचारबंदी वगैरे कारणांमुळे. मग इंग्लंडच्या लोकांनी साहजिकच म्हटलं की, "तुम्हाला मुंबईतल्या मुंबईत विमानतळावर यायला तीन दिवस लागतात तर आम्ही मुंबईत कशी काय गुंतवणूक करायची?" हा प्रकल्प नंतर हिंदुस्थानऐवजी चीनमध्ये सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं.
 कोणी विचारेल, हिंदुस्थानात दंगे झाले पण चीनमध्ये काय शांतता आहे काय? पेकिंगमधल्या तिएनमान चौकात तीन हजार विद्यार्थ्यांवर रणगाडे घातले; पण त्या चीनमध्ये इंग्लिश भांडवल, अमेरिकन भांडवल तयार आहे आणि हिंदुस्थानात मात्र कुठे मशीद पडली, कुठे थोडे दंगे झाले, तीनचार हजार माणसं मेली म्हणजे फार मोठं झालं असं नाही. मग हिंदुस्थानात भांडवल यायला का घाबरतं आणि दंगे तिथेही

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ८८