पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 बळिराज्य म्हणजे काय असावं? ही संकल्पना आपण पायरीपायरीने मांडत आलो आहोत. कांद्याला भाव हवा. पण मजुरांनी मजुरी मागावी अशा तऱ्हेने आम्ही कांद्याचा भाव मागत नाही. शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे ही मागणी कारखान्यातले मजूर ज्याप्रमाणे पगावाढीची मागणी करतात, त्या प्रकारची मागणी नाही. शेतीमालाला भाव मिळत नाही याचं कारणच मुळी सरकारचं धोरण आहे. 'शेतकऱ्यांचं मरण हे सरकारचं धोरण आहे' अशी घोषणा त्यावेळी दिली आणि शेतमालाचा भाव पाडण्याचं कारस्थान सरकार रचतं तेवढं त्यांनी रचू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. देशातील गरिबी हटवायची असेल तर काहीच करू नका, फक्त गरिबी टिकावी आणि वाढावी म्हणून जे प्रयत्न करता आहात तेवढे थांबवा एवढेच आमचे म्हणणे होते. थोडक्यात, बळिराज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये जाणीवपूर्वक, ठरवून, धोरण म्हणून कोणाच्याही शोषणाची व्यवस्था असणार नाही ते राज्य. बळिराज्य हा शब्द वापरताना, ज्या व्यवस्थेमध्ये सरकारचा हात कमीत कमी आहे अशी व्यवस्था शेतकऱ्यांना हवी आहे एवढेच अभिप्रेत आहे.
 शेगावचा मेळावा ही त्याची पुढची पायरी. त्यावेळी पंतप्रधानांनी घोषणा केली की जुनी नियोजनाची व्यवस्था सोडून नवीन खुल्या अर्थव्यवस्थेकडे आम्ही जातो आहोत. अर्थशास्त्राच्या भाषेत सोप्या शब्दात सांगायचे झाले तर खुल्या बाजारपेठेची व्यवस्था म्हणजे बळिराज्य असे म्हणता येईल. 'खुल्या बाजारपेठेची व्यवस्था' हा मुळात अर्थशास्त्रीय इंग्रजी शब्दाचा मराठी तर्जुमा. मग ज्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास नाही त्या 'ग्यानबां'ना हा अर्थ कसा समजवायचा? खुली म्हणजे काय, बाजारपेठ म्हणजे काय, ती खुली नसली म्हणजे कशी असते या सगळ्याचं पुस्तकी विवेचन करण्याऐवजी, शेतकरी संघटनेने अर्थशास्त्र 'ग्यानबा' पर्यंत पोहोचविण्याच्या तिच्या खास कौशल्याने 'बळिराज्य' हा शब्द वापरला. आपण नांदेडच्या अधिवेशनात असं म्हटलं की 'इडा पिडा टळणार आहे, बळीचं राज्य येणार आहे आणि शेगावला 'बळिराज्य येतसे आता...' ते उंबरठ्यापर्यंत आलं आहे असं म्हटलं.
 त्यानंतरच्या वर्षामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्या. बळिराज्य यावं अशी इच्छा बाळगणारे, शेतकरी समाजातील ज्यांना प्रश्न समजला आहे तेवढे लोक (सगळे नाही, सरकारने मायबाप व्हावे आणि शेतकऱ्यांनी जे काही वाढायचं असेल ते वाढावं,मायबाप सरकानं जगवलं तर जगू अशीच बुद्धी असले शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आहेत.) यांना असं वाटलं आणि पटलं की आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करतो, आमच्या जमिनीमध्ये एका दाण्याचे शंभर दाणे होतात त्या आम्हा शेतकऱ्यांना दुसऱ्यांकडून भीक मागायला लागावी ही अनैसर्गिक गोष्ट आहे. असं जर होत असलं तर त्यामागची कारणं तपासून पाहायला हवीत. हे ज्यांना

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ८६