पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते ज्ञान मिळाविण्याचं विद्यापीठ इथं सेवाग्रामला आहे. आपला इथं सेवाग्रामला येण्याचा योग होता म्हणून हे सगळं घडलं."
 बळिराज्य, नाहीतर विनाश
 दुसऱ्या गणराज्याची आज आपण घोषणा करतो आहोत. मी जेव्हा दहा वर्षांपूर्वी शेतीमालाच्या भावाविषयी बोलायला लागलो तेव्हा सगळेच म्हणत, "हे असं कुठं असतं काय?" आजही आपण दुसऱ्या गणराज्याची घोषणा केली त्याची उद्या बातमी आल्यानंतर लोक म्हणणार आहेत की, "हे शरद जोशी काहीच्या काही बोलत असतात." पण, विश्वास ठेवा, माझी खात्री आहे की हिंदुस्थानची घटना २००३ सालाच्या आत बदलून ती बळिराज्याची घटना झालेली असेल. ही घटना जर बदलली नाही, सरकारच्या हातातील आर्थिक सत्ता काढून घेतली गेली नाही, बळिराज्य आलं नाही तर हा देश टिकूच शकत नाही. म्हणजे गेली दहा वर्षे जे बळिराज्य यावं म्हणून आपण जी लढाई केली त्या लढाईचं यश सर्व तव्हेने साकार होताना पुढे दिसत आहे आणि मी माझं हे भाग्य समजतो की बळिराज्याची ही घोषणा करायला, त्याची शपथ घ्यायला कुठंतरी गेटवे ऑफ इंडियाच्या सिमेटाच्या चौकात न बसता सेवाग्रामला बापूकुटीच्या शेजारी आपण बसलो आहोत. कदाचित, यातूनच देशाचा इतिहास घडायचा आहे.
 दुसऱ्या भारतीय गणराज्याच्या पहिल्या नागरिकांनो
 आपण इथून निघताना थोडं गंभीर होऊन, अंतर्मुख होऊन निघायला पाहिजे. आपण काय ठरवलंय. याचा मी थोडक्यात आढावा घेतो. नुसत्याच घोषणा देत जाऊ नका.
 निर्णय कृषिनीती
 शेतीसंबंधीची कृषिनीती आम्ही शेगावला ठरविलेली आहे. आमचा शेगावचा जाहीरनामा तीच कृषिनीती आहे. लोकसभेमध्ये सरकारने कृषिनीती म्हणून जो काही फाटका कागद ठेवला आहे, अक्षरशः हास्यास्पद कागद आहे, त्याला कृषिनीती म्हणणं म्हणजे शेतीचा अपमान आहे, शेतकऱ्याचा अपमान आहे, देशाचा अपमान आहे. सरकारचा हा कृषिनीतीचा कागद आम्ही लाथाडून, झिडकारून लावतो. हा पहिला निर्णय आहे.
 भीतीमुक्ती
 दुसरा निर्णय, पाशा पटेलांनी मांडलेला ठराव. त्यांनी म्हटल्याप्रमाणे उद्यापासून नोकरांना घाबरायचं नाही, त्यांनी नखं काढून दाखविली तरी. त्यांना सरळ विचारायचं, "तू दिवसभर करतो काय आणि कमवतो काय याचा हिशोब देतो

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ८३