पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पटेल यांनी नोकरदारासंबंधीच्या ठरावाने आखून दिला आहे. लक्षात ठेवा, आता तुम्हाला या नोकरदारांना घाबरून चालायचं नाही. इतके दिवस तुम्ही एखादा नोकरदार अधिकारी आला की म्हणत होता, "तसं बरं चाललंय, पण आमच्यावर जरा कृपादृष्टी असू द्या" आणि त्याच्यापुढे वाकत होता. आपल्या अध्यक्षांनी मांडलेल्या ठरावाने उद्यापासून काय होणार आहे, माहीत नाही? आता तुम्ही त्याला बाबा म्हणा, वाघ म्हणा, का वाघ्या म्हणा, का वाघोबा म्हणा, तो तुम्हाला खायलाच येणार आहे. उद्याची वर्तमानपत्रं हे सगळे अधिकारी वाचणार आहेत. पाशा पटेलांचं भाषण वाचणार आहेत आणि तुम्ही त्याच्यासमोर गेलात म्हणजे तुम्हाला ते विचारणार आहेत, "काहो, तुम्ही शेतकरी ना? तुम्हाला आमचा पगार वाढायला नको काय? आणि तुम्हाला आमची बढती व्हायला नको काय? आम्ही भ्रष्टाचार करू नये असं तुम्हाला वाटतं काय?" असं म्हणून तो आता तुमच्या नरड्याला धरणारच आहे. सिंहगडावर तानाजी पडला आणि मावळे घाबरून पळायला लागले. तेव्हा शेलारमामा काय म्हणाला, "अरे आता पळता कुठे? मागचे दोर मी केव्हाच कापून टाकले आहेत. तसं, पाशा पटेलांनी तुमचे मागचे सगळे दोर कापून टाकले आहेत." तुम्हाला पुढंच जाऊन लढाई देणं भाग आहे.
 तेव्हा आता उद्यापासून घाबरायचं सोडून द्या. छाती पुढं काढून या अधिकाऱ्याला सांगा, "अरे ए, तू माझा नोकर आहेस, माहीत आहे का तुला? तू नोकर सरकारचा नाही, तू नोकर माझा आहेस." ही हिम्मत जर तुम्ही ठेवली तर दुसऱ्या गणराज्याचे तुम्ही नागरिक झाला, तर बळिराज्याचे सैनिक झालात असं समजा.
 या सगळ्या लढाईमध्ये किती वेळा चिंता केली, किती वेळा योजना केल्या आणि असं वाटलं की लढता लढता एक दिवस आपल्याला मार्ग सापडेल; पण काय दैव म्हणावं, मुंबईला जाऊन जे जमलं नसतं, जी दृष्टी मिळाली नसती ती मुंबईचा कार्यक्रम रद्द झाल्याने मिळाली. मोठी भाग्याची गोष्ट आहे की मुंबईचा कार्यक्रम रद्द झाला. या गांधीबाबांनी सांगितलं की, "अरे त्या मुंबईला गेटवे ऑफ इंडियापाशी हिंदुस्थानातल्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय सापडणार आहेत? तिथं तुम्ही नेहरूबाबाची पाटी पुसली काय अन् न पुसली काय, काही फरक पडणार नाही. हिंदुस्थानच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधाची असतील, सगळा देश गरीब का राहिला हे शोधायचं असेल, सगळीकडे दंगे का चालले आहेत, माझं रक्त सांडलं तरी हिंदू-मुसलमान एकमेकांत का लढताहेत हे समजायचं असेल तर ते गेटवे ऑफ इंडियाला ज्ञान मिळणार नाही,

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ८२