पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुढच्या वर्षी जर का कापूस एकाधिकार खरेदीच्या बरोबर मुक्त व्यापार इथे चालू दिला नाही तर शेतकरी संघटना स्वतः कापूस खरेदी करण्याचं काम करेल आणि हिंदुस्थानात, परदेशांत आवश्यक तिथे नेऊन विकेल.
 आमच्या हातातल्या या, नेहरूंनी घातलेल्या बेड्या त्यांच्या पहिल्या गणराज्याच्या पतनाबरोबर आणि अयोध्येच्या मशिदीबरोबर पडून गेल्या आहेत. बियाणं आयात करायचं आहे, तर आम्ही करणार आहोत. तुम्ही थांबवणारे कोण? कापसाची निर्यात आम्ही करणार आहोत. तुम्ही थांबवणारे कोण? कांदा आम्ही पाठवायचा नाही, तो नाफेडमार्फतच गेला पाहिजे असं म्हणणारे तुम्ही कोण? जे जे म्हणून करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे, जे जे आम्ही करू शकतो, ते आम्ही करणार आहोत. तुमची काय पोलिसांची ताकद आहे? फार फार तर आम्हाला पकडाल, इतकंच ना?
 आणखी एक मुद्दा. महाराष्ट्र सरकार कायद्याच्या ४८ (अ) कलमाने शेतकऱ्याचा शेतीमाल विकल्यानंतर शेतकऱ्याने सोसायटीतून काढलेल्या कर्जाची रक्कम वळती करून घेण्याची व्यवस्था आहे. ही व्यवस्था बळिराज्यात, दुसऱ्या गणराज्यात बसत नाही. नेहरू - राज्यातील ही व्यवस्था आजपासून संपली असं आम्ही जाहीर करतो.
 आपला माल आपण शहरात घेऊन आलो तर ते म्हणतात कृषि उत्पन्न बाजार समितीतच गेलं पाहिजे. माझ्या घरची भाजी, मी टोपली घेऊन रस्त्यावर बसायला या नेहरूवादाच्या राक्षसाने आम्हाला बंदी केली होती. आजपासून ती बंदी संपली. तुमचा माल जिथं घेऊन जाता येईल, जिथं बसून विकता येईल, देशात परदेशात, तुम्ही विका. काय कोण शिक्षा करील ती आपण सगळे मिळून भोगू.
 सहकारी संस्था, आम्हाला काढायची आहे. आम्ही दहा अकरा जणांनी बसून सोसायटी काढली आणि अर्ज केला तर वरचा साहेब म्हणतो, "नाही, तुम्हाला सोसायटी काढता येणार नाही. कारण अशी सोसायटी काँग्रेसच्या एका पुढाऱ्याने आधीच काढलेली आहे." साखर कारखाना काढला तुम्हाला परवानगी नाही कारण आमच्या पुढाऱ्याने आधीच काढलेला आहे. सहकारामध्ये अकरा शेतकरी एकत्र आले की त्यांना सहकारी संस्था काढायचं स्वातंत्र्य हे बळिराज्यदुसरे गणराज्य देत आहे. सरकारची वाट न पाहता तुम्ही संस्था चालू करा. पाहू काय होते ते?
 बळिराज्याच्या वाटचालीचा मार्ग
 हे सगळं करायचं तर तुम्ही सर्वांनी मनातली भीती काढून टाका. हे माझं वाक्य नाही, या गांधीबाबांचं वाक्य आहे. त्याचा रस्ता आपले नवे अध्यक्ष पाशा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ८१