पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपलं आहे. त्याचा मुडदा झाला आहे. तो जाळायचा केव्हा त्याची तारीखच फक्त ठरायची आहे. दुसरं गणराज्य येणार आहे, नाही तर हा देश फुटणार आहे.
 यादवीची लक्षणे
 मी हे का म्हणतो, लक्षात घ्या. अयोध्येच्या प्रश्नावर दंगा झाला.६ डिसेंबरला मशीद पडली आणि दंगा झाला, समजण्यासारखं आहे. कुणा हिंदुची डोकी फिरली, कुणा मुसलमानांची डोकी फिरली. भावाभावामध्येसुद्धा असं भांडण होतं; पण जानेवारी महिन्यात जी दंगल झाली ती अशी साधी नाही. त्यात हिंदू आणि मुसलमान असा काही संबंध नाही. हिंदू म्हणजे फक्त मुंबईतला हिंदू आणि मुसलमान म्हणजे फक्त मुंबईचा मुसलमान असं नाही ना? आपल्या गावांतही हिंदू आहेत, मुसलमान आहेत; मग दंगा झाला तो फक्त मुंबईत झाला. कोणत्याही गावात झाला नाही याचं कारण काय? याचं कारण दंगा हा हिंदू म्हणून झाला नाही, मुसलमान म्हणून झाला नाही; दंगा ज्यांना करायचा होता त्यांनी दंगा मुद्दाम करवून आणला, घडवून आणला. का घडवून आणला, समजून घ्या.
 दंग्याचे रसायन
 रामाचे नाव भक्तीनं घेणारी माणसं फार थोडी. रामायण आयुष्यात एकदा तरी वाचलं असेल अशी माणसंही थोडी. दंगा का झाला ते समजावून घ्या, कारण आपल्या गणराज्याचं, दुसऱ्या गणराज्याचं सगळं यश त्यावर अवलंबून आहे.
 गेल्या महिन्यात राष्ट्रीय एकात्मता परिषदेची बैठक भरली होती. त्या बैठकिमध्ये अयोध्येतील या मंदिराविषयी चर्चा झाली. सगळे लोक भारतीय जनता पार्टीला खूप नावं ठेवत होते. मी काही भारतीय जनता पार्टीविषयी चांगलं बोलणारा माणूस नाही. मीटिंगनंतर चहाच्यावेळी गृहमंत्री शंकरराव चव्हाणांना मी म्हटलं की, "शंकरराव, सगळ्यांनी भाजपावर टीका केली हे ठीक आहे, पण काँग्रेसवाल्यांना भाजपावर टीका करण्याचा अधिकार नाही. तुमचं म्हणणं की सत्ता मिळविण्याकरिता त्यांनी रामाच्या मंदिराचं भांडवल केलं, एवढंच ना? मग तुम्ही काय केलं इतके दिवस? तुम्ही इतके दिवस नेहरू-गांधी घराण्याचं नाव घेतलं आणि सत्ता हाती ठेवली. परिस्थिती अशी तयार केली की प्रियांका गांधीचं नाव आसाममध्ये माहीत आहे; पण अटल बिहारी वाजयपेयींचं नाव तेथे कोणाच्या कानी पडलेलं नाही. नेहरू घराण्यातल्या पाळण्यातल्या बाळाचं नाव हिंदुस्थानातल्या सगळ्या कोपऱ्यात माहीत होतं; पण आयुष्य कुर्बान केलेल्या नेत्याचं आणि देशभक्ताचं नाव माहीत होत नाही. मग, त्यांनी काय केलं; भाजपाची त्यात चूक काय?

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७५