पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बंदराचं नाव बदललं असतं आणि परत आलो असतो.
 पण, हा कार्यक्रम स्थगित करावा लागला, २६ जानेवारीला दुसऱ्यांदा स्थगित करावा लागला; एकदा अयोध्येच्या दंगलीमुळे, दुसऱ्यांदा मुंबईच्या दंगलीमुळे. आता मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, आपल्याला काही वेगळ्या हेतूने हा कार्यक्रम स्थगित करणं भाग पडलं. कार्यक्रम बदलून इथं सेवाग्रामला आपण जमलो यामागे काही हेतू आहे असं मला वाटतं. तुम्हा सगळ्यांना सेवाग्रामचा इतिहास माहीत आहे.
 महात्माजींचे अपूर्ण स्वप्न
 गांधीजी आफ्रिकेतून आले, तेव्हा त्यांनी अहमदाबादजवळ साबरमतीला आश्रम काढला. तिथून त्यांचं कार्य चालू होतं. म. गांधी साबरमतीच्या आश्रमातून दांडीला मिठाचा सत्याग्रह करायला निघाले. आश्रमातून पाऊल बाहेर टाकताना त्यांनी म्हटलं, "आता या आश्रमात हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतरच परत येईन. परतंत्र हिंदुस्थान असेतो येणार नाही." त्यावेळी त्यांनी एक घोषणा दिली होती, "माझ्या सगळ्या भारतवासीयांनो, इंग्रज सरकारला काढून टाकायचे आहे तर यात कठीण काय आहे? पहिल्यांदा, तुमच्या मनातली भीती काढून टाका. इंग्रज राज्य आम्ही मानत नाही असं एकदा तुम्ही स्वतःला सांगा, इंग्रजांशी कोणतंही सहकार्य करणार नाही असं ठरवा. विद्यार्थ्यांनो, शाळा सोडून द्या. नोकरदारांनो, नोकऱ्या सोडून द्या. इंग्रज सरकार जणू इथं नाहीच असं वागा." महात्मा गांधींनी सांगितलं, "तुम्ही एवढं करा, मी तुम्हाला एका वर्षात स्वराज्य मिळवून देतो." जमलं नाही. कारण, लोकांनी विश्वास ठेवला नाही. लोकांनी जो काही आंदोलनामध्ये भाग घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही. एक वर्ष होऊन गेलं, स्वातंत्र्य मिळालं नाही. साबरमतीला परत जायचं नाही. अशा निराश अवस्थेमध्ये त्या महात्म्यानं शेवटी इथं सेवाग्रामला येऊन मुक्काम केला. तुम्ही आता येताना बापूंची कुटी पाहिली. प्रत्येकवेळी ती कुटी पाहताना १९३० सालापासून १९४७ सालापर्यंत या कुटीमध्ये बसल्या बसल्या बापूजींच्या मनामध्ये काय काय विचार आले असतील याची कल्पना करून माझ्या पोटामध्ये गोळा उठतो.
 या सेवाग्रामचं आणखी एक महत्त्व आहे. महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू हे एकमेकांना अत्यंत प्यारे होते; पण त्यांच्यामध्ये एक मोठा मतभेद होता. गांधींचं म्हणणं असं की सगळ्या देशाचा विकास व्हायचा असेल, गरिबी हटायची असेल तर ती खेड्याच्या विकासातून हटेल. खेडं मोठं करा, खेडं श्रीमंत करा म्हणजे देश आपोआप श्रीमंत होतो, असं गांधीजींचं म्हणणं होतं.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७३