पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होणार होतो, पंजाबमधल्या शेतकऱ्याच्या गव्हाचं दुःख, हरयाणामधल्या शेतकऱ्याच्या गव्हाचं दुःख पुढे मांडण्यासाठी. कारण, आम्ही म्हणतो 'सगळे शेतकरी भाऊ भाऊ' आमचं स्वप्न आहे की पंजाबहरयाणातल्या गव्हाच्या शेतकऱ्यावर संकट आलं तर ते निवारण्याकरिता महाराष्ट्रातला शेतकरी पुढे व्हावा आणि ज्वारीकापसावर संकट आलं तर ते निवारण्यासाठी तितक्याच हक्काने पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनीसुद्धा उठून दिल्लीला उतरावं. मुंबईला आपण याकरिता जाणार होतो.
 त्याचबरोबर, आपण असं म्हटलं की गव्हाची आयात हा काही साधा प्रश्न नाही. सबंध नेहरू-व्यवस्था ही याला जबाबदार आहे. हे धोरण नेहरूंनी चालवलं. शेगाव मेळाव्याच्या वेळी आपल्याला असं वाटलं होतं की, आता हे नेहरूंचं धोरण संपत आलं; पण नाही. ते नेहरूनीतीचं भूत पुन्हा एकदा आपल्या मानगुटीवर बसत आहे. हे भूत मानगुटीला बसायला नको असेल तर काय करायला पाहिजे? सगळ्या महाराष्ट्रात नेहरूनीतीच्या पुतळ्यांचं दहन करण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतला आणि महराष्ट्रात जवळजवळ अडीच हजार पुतळे जाळले गेले. काही लोकांनी माझ्यावर टीका केली. ते विचारायला लागले की, "तुम्ही नेहरूंचे पुतळे का जाळता?" मी म्हटले, "माझा नेहरूंवर व्यक्तिशः राग नाही आणि मला जाहीररीत्या कबूल करायलाही काही हरकत वाटत नाही की मी एका काळी आकाशात परमेश्वर, हिंदुस्थानात पंडित जवाहरलाल नेहरू आणि महाराष्ट्रात एसेम जोशी ही तीन दैवतं मानत होतो; पण, ज्याला एका काळी मानलं, त्याच्या धोरणांचा काही भयानक परिणाम झाला, तो डोळ्यासमोर आला, तरीसुद्धा मी माझं मत बदललं नाही तर मी मोठी चूक केली असं होईल." रशियामध्ये मार्क्सचे एंगल्सचे, स्टॅलिनचे, लेनिनचे पुतळे होते; पण मार्क्स, एंगल्स, स्टॅलिन, लेनिन यांचं म्हणणं ऐकलं आणि आपल्या पोरांच्या हाती भिक्षापात्र आलं असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा रशियामधल्या लोकांनी एका रात्रीच्या आत मार्क्स, एंगल्स, स्टॅलिन, लेनिन यांचे पुतळे खाली खेचून काढले आणि नवीन प्रगती करायला ते मोकळे झाले.
 मुडदा जाळायलाच हवा
 जुने मुडदे किती दिवस सांभाळणार? नेहरूनीतीच्या दहनाचं कारण काय? एकदा घरातला माणूस मेला की, तो कितीही आवडता असो, मेला म्हणजे त्याचा दहनविधी करणं आवश्यक आहे. घरात मेलेल्या माणसाचा मुडदा ठेवून काही मिळत नाही आणि नेहरूनीती मेलेली आहे हे सांगायला माझ्याकडे दोन डॉक्टरांची सर्टिफिकेट्स आहेत. एका डॉक्टरचं नाव आहे पी.व्ही. नरसिंह

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७१