पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मला प्रश्न विचारला, "साहेब, पुन्हा काही गडबड व्हायची नाही ना?" मी म्हटलं, "आता कशी गडबड होईल? झालं ते अयोध्याबियोध्या; संपलं."
 पण पुन्हा फसलो मी आणि सहा जानेवारीला पुन्हा मुंबईमध्ये दंगल घडली. ती दंगल काही हिंदूची नाही की मुसलमानांची नाही. मुंबईमध्ये दंगल कुणी घडवून आणली? सगळ्या वर्तमानपत्रांनी आता स्पष्टच लिहिले आहे, "तिथले गुंड, तिथेल पुढारी आणि जागेचे दलाल यांनी ही दंगल घडवून आणली." पण, परिणाम आमच्यावर झाला. दंगलीने कुणाला काय मिळालं असेल ते असो, पण, त्या प्रकरणाची धग आम्हाला लागली आणि शेतकरी संघटनेने आखलेला कार्यक्रम दुसऱ्यांदा पुढे ढकलावा लागला.
 शेतकरी संघटना जिवंत प्रवाह
  मला अशी भीती वाटली होती की तिसऱ्यावेळी लोकांना जमा म्हणून सांगितलं तर लोक 'लांडगा आला रे आला' गोष्टीतल्याप्रमाणे कदाचित जमायचे नाहीत. कोणी सांगावं, याही वेळा कार्यक्रम पुढे ढकलला गेला तर? पण आज ज्या गतीनं हे विस्तीर्ण मैदान तुम्ही भरून टाकलं त्यामुळे गेल्या दोन महिन्यांतल्या माझ्या सगळ्या चिंता निघून गेल्या. ही शेतकरी संघटनेची गाडी म्हणजे काही इंडियातील कारखान्यात तयार झालेली गाडी नाही. किल्ली कितीही फिरवली तरी चालू होत नाही. आमची गाडी सेल्फ स्टार्टरची आहे. किल्ली फिरवली की लगेच चालू होते. नको असेल तेव्हा बंद करून ठेवता येते, पुन्हा हवी तेव्हा चालू करण्यात काहीच अडचण नाही.
 नऊ डिसेंबरचा मुंबईचा कार्यक्रम रद्द झाला, सव्वीस जानेवारीचाही मुंबईचा कार्यक्रम रद्द झाला. मला असं वाटत होतं, की हे आमचा कार्यक्रम रद्द झाला ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
 आज इथं सेवाग्रामला आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, "अरे नाही, घडली ती आपल्या भाग्याची गोष्ट घडली आहे."
 मुंबईचा अपशकून भाग्याचा
 आपण मुंबईला कशा करता जाणार होतो? मुंबईला जाणार होतो आम्ही चांगल्याच कामाकरिता. गव्हाची आयात थांबवावी म्हणून जाणार होतो. 'बंदर न्हेरू, गद्दार गेहूँ, रोकेंगे।' म्हणून जाणार होतो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय दुसऱ्या काही चिंता नाहीत? खूप आहेत. महाराष्ट्रातला शेतकरी यंदा सगळ्या पिकांच्या बाबतीत पार नागवला गेला आहे. कापूस शेतकरी नागवला गेला आहे, ज्वारीच्या शेतकऱ्याची ज्वारी काळी पडली, ज्वारी विकत घ्यायला कुणी तयार नाही. आमची दुःखं आम्हाला खूप आहेत आणि तरीसुद्धा मुंबईला आम्ही जमा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७०