पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


दुसऱ्या गणराज्याचा अर्थात, बळिराज्याचा ओनामा


 माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो,
 भाषणाची सुरुवात मी 'माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो' ने करतो आहे आणि माझं भाषण संपायच्या आधी मी तुम्हाला 'भारताच्या दुसऱ्या गणराज्याच्या पहिल्या नागरिकांनो' म्हणून हाक घालणार आहे.
 या मेळाव्याच्या समोरापाचे भाषण करायला मी उभा राहिलो आहे. तरी वर्ध्याकडून येणाऱ्या रस्त्याने अजूनही मायबहिणी डोक्यावर गाठोडी आणि शेतकरी भाऊ हातात पिशव्या घेऊन मोठ्या संख्येने येतच आहेत. सगळं मैदान भरून गेलं आहे. या सर्व भावाबहिणींना किती लांबून यावं लागलं असेल, गाडीत काय काय अडचणींना तोंड द्यावं लागलं असेल, वर्ध्यात उतरलं म्हणजे जवळच सभा असेल अशी कल्पना करत आलेल्या या भावाबहिणींना वर्ध्यापासून इथं आठ किलोमीटरवर चालत यायला किती कष्ट पडले असतील आणि तरीही निदान शेवटचं भाषणतरी ऐकायला मिळावं म्हणून ही माणसं ओझी सांभाळत लगाबगा येत आहेत हे सगळे विचार मनात येऊन मन भरून येत आहे. आज हा समोरचा समुदाय बघून मला धन्य वाटत आहे.
 दोनदा अपशकून?
 सहा डिसेंबरला अयोध्येत आक्रित घडलं. सात डिसेंबरपासून आजपर्यंत मी अगदी बेचैन होतो. शेतकऱ्यांचं एक संघटन तयार व्हावे, त्यांच्या घामाला दाम मिळावा म्हणून मी आणि माझे सहकारी गेली दहाबारा वर्षे वणवण फिरलो. नाही नाही ती वाईटसाईट माणसं यशस्वी होताना दिसतात आणि आम्ही मुंबईला जमायचं ठरवलं, त्यावेळी अयोध्येमध्ये ते प्रकरण घडलं आणि मुंबईमध्ये आम्हाला जमता येईनासं झालं. काय घडलं आमच्या हातून की आम्हाला अशी शिक्षा व्हावी? पुन्हा हिम्मत बांधली, नऊ डिसेंबरच्या ऐवजी सव्वीस जानेवारीला कार्यक्रम ठरवला. जेव्हा हा कार्यक्रम ठरला तेव्हा माझ्या कार्यकर्त्या भावांनी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ६९