पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मला प्रश्न विचारा की असं का? पण त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं नाही तर राग मानू नका. कारण काय? मी असा निर्णय का घेतला हे मी तुम्हाला सांगितलं तर ते उत्तर तुमच्या कानात जायच्या आधीसुद्धा सरकारच्या कानात जाईल आणि सगळ्याच आंदोलनाला धोका होईल. यापुढचं नवं आंदोलन तर यापेक्षासुद्धा जास्त नाजूक आहे. समजा, त्यावेळी आंदोलनाची माझी जी काही रणनीती होती ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली किंवा दिल्लीला पंतप्रधानांच्या कानावर गेली असती तर काय झालं असतं? जास्तीत जास्त चारपाच हजार शेतकऱ्यांना त्यांनी आदल्या दिवशीच पकडून ठेवलं असते. काय फार मोठं नुकसान नसतं झालं; पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे; व्यापारी जगामध्ये किंवा आर्थिक जगामध्ये जर काही एवढीशी बातमी फुटली तर सगळा डाव कोसळून पडतो. जे काही आपल्याला करायचे आहे ते व्यापारी पद्धतीने डावपेच लढवायचे आहेत. तुमची तयारी असली तर आपण त्याच्यामागे जाऊ. जर तुमची तयारी नसली तर केलंच पाहिजे असा माझा मुळीच आग्रह नाही, तुम्ही ते केलं नाही तरीसुद्धा दुसरे लोक ते करणार आहेत. ही संधीच अशी निर्माण झाली आहे की दुसरे लोक ते करणार आहेत. हे तुम्ही करणार आहात किंवा नाही हे फक्त तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही नाही केलं आणि आपली शेतकरी संघटना झेंड्यांची, लढाऊ तेवढीच राहू दे असं ठरवलं तरीसुद्धा काही बिघडणार नाही. तुम्ही करू शकता; पण त्यापलीकडे ज्या बीजाची लागवड तुम्ही केली त्याला फळ येत असताना घालायचं खतपाणीसुद्धा आपल्या हाताने जावं असं तुम्हाला वाटत असेल तर एक प्रयोग वर्धा जिल्ह्यामध्ये अमलात आणावा अशी विनंती करण्याकरिता मी वाला आलो आहे. तुम्ही कार्यकर्त्यांनी जर ठरवलं की आपण हा कार्यक्रम अमलात आणू तर मग...
 एक मोठी प्रचंड संधी चालून आलेली दिसते आहे. शक्यता चालून आलेली दिसते आहे. ही लढाई आहे जुनीच. फक्त नव्याने लढण्याकरिता नव्या हत्यारांची आणि व्यूहरचनेची गरज आहे.

(२२ सप्टेंबर १९९१ वर्धा बैठक.)
(शेतकरी संघटक ६ ऑक्टोबर १९९१)


◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ६३