पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुस्तिका आपण काढली आहे. 'भारतीय शेतीची पराधीनता' - ती पुन्हा एकदा वाचून पाहावी. त्यावेळी मी असं म्हटलं होतं की, समजा, सरकारचं धोरण शेतकरीविरोधी नसतं तर आपण काय केलं असतं? मघाशी मी यादी सांगितली ती - विविध तऱ्हेचं उत्पादन काढलं असतं, त्याच्या साठवणुकीची व्यवस्था केली असती, प्रक्रियेची व्यवस्था केली असती, निर्यातीची व्यवस्था केली असती. शेतकरी संघटना म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्सप्रमाणे शेतकऱ्यांची एक संस्था झाली असती. आंदोलक संस्था होण्याची गरज नव्हती. आज सरकारचं शेतकऱ्याविरुद्धचं धोरण बदललं आहे असं नाही; पण ते धोरण सरकार अमलात आणू शकत नाही. निदान काही काळ तरी सरकारचे हातपाय बांधलेले आहेत. आपल्या छातीवरचा मोठा चोर उठला आहे, धाकटा चोर अजून छातीवर येऊन बसायचा आहे. तुम्ही पटकन कोलांटी उडी मारून जर उभं राहण्याचं कौशल्य, तत्परता दाखविली तर तुम्ही या अडचणींच्या परिस्थितीतून सुटू शकता. अशी एकूण आजची परिस्थिती आहे आणि म्हणून प्रश्न पडतो तो असा की आपण जाणार आहोत कोणत्या दिशेने?
 राष्ट्रीय कृषिनीती
 राष्ट्रीय कृषिनीतीचा उल्लेख झाला. मी स्थायी कृषि सल्लागार समितीचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्याहीवेळी मी तुमच्याशी बोललो होतो. कोणाच्याही मनामध्ये अशी कल्पना नव्हती की मी दिल्लीला जाऊन बसलो आणि तिथं राष्ट्रीय कृषिनीती असं काही एक पुस्तक तयार केलं म्हणजे हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटतील. एवढं सोपं असतं तर आम्ही आंदोलनं कशाला केली असती? जर का शेतकऱ्याविषयी सरकारची धोरणं बदलणं इतकं सोपं असतं तर आम्हाला इतक्या लोकांना आयुष्याचा उन्हाळा करून घ्यायची आवश्यकता नव्हती; पण आपण ज्याला मदत केली असा एक, निदान त्यावेळी थोडाफार सचोटीचा वाटणारा, पंतप्रधान आला आहे. मंत्रालयातली सगळी कागदपत्रं ही शेतकऱ्याविरुद्धच्या विषारी प्रचाराने भरलेली आहेत. या पंतप्रधानांनी जर काही करायचं ठरवलं तर त्याला टेकू देणारी काही कागदपत्रं तरी तयार असावीत, ती तयार करण्याचं काम आपण घेतलं. राष्ट्रीय कृषिनीतीला मान्यता मिळाली नाही. विश्वनाथ प्रतापसिंगांचीही याच्यात चूक आहे. चंद्रशेखर सरकारला आणि देवीलालना तर ही राष्ट्रीय कृषिनीती परवडण्यासारखीच नव्हती आणि काँग्रेस सरकारला, राष्ट्रीय कृषिनीती म्हणजे विश्वनाथ प्रतापसिंगांची कल्पना, ती राबविण्याचे काहीच कारण नाही. तेव्हा ही राष्ट्रीय कृषिनीती म्हणून जे काही आम्ही लिहिलं त्याचं भाषांतर तुम्ही शेतकरी संघटकमध्ये वाचलं, ती राष्ट्रीय कृषिनीती आता

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ५६