पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतं ते आता सरकार करू शकत नाही. त्यांचे हात बांधल्यासारखे झाले आहेत. म्हणजे सरकारचं धोरण बदललं असं नाही. सरकारच्या मनामध्ये शेतकऱ्यांविषयी काही प्रेम निर्माण झालं असं नाही. शेतकऱ्याविषयीचा द्वेष, शेतकऱ्याविषयीचं शत्रुत्व तितकंच कायम आहे. फक्त मनामध्ये खूप राग असूनसुद्धा काही करता येत नाही, अशी परिस्थिती सध्या सरकारची झालेली आहे.
 सत्याग्रहाचे साधन निष्प्रभ
 राजकीय आणि आर्थिक बदलाबरोबर एक तिसरी महत्त्वाची गोष्ट घडलेली मला दिसते. आपण आर्थिक हत्यारं वापरली त्याच्याबरोबर सत्याग्रहाची हत्यारंही वापरली. आपण रस्त्यावर गेलो. हजारोंच्या संख्येने तुरुंगात गेलो. त्यातून शेतकऱ्यांची जागृती तयार झाली. सत्याग्रहाचं हत्यार आपण फार प्रभावीपणे वापरलं. आज देशामधील परिस्थिती अशी आहे की, मंडल आयोग हा किती छोटा विषय. सगळे मिळून काही एक साताठ हजार नोकऱ्यांचा विषय - पण त्याकरिता दिल्लीच्या आसपास दीडशे तरुणांनी स्वतःला जाळून घेतलं, अयोध्येला रामाचं मंदिर. त्याच्यावाचून काय कुणाची भाकरी अडली आहे? पण त्या विषयावर आज शेकडो माणसं मरायला तयार आहेत. पंतप्रधानांकडे दररोज जी बातमीपत्र येतात त्या बातमीपत्रांमध्ये – पंजाबमध्ये ४० मेले, आसाममध्ये १२ मेले आणि बाकीच्या ठिकाणी तामिळनाडू वगैरे... अशा ज्या सगळीकडच्या बातम्या येतात त्या सगळ्या रक्तपाताच्याच येतात. देशामध्ये अशी परिस्थिती असताना आपण जरी रस्त्यावर जायचं ठरवलं, जरी जेल भरायचं ठरवलं तरीसुद्धा ८० मध्ये, ८६ मध्ये जो परिणाम घडून आला तो आपल्या आंदोलनाने आज ९१ मध्ये घडून येण्याची शक्यता नाही.
 म्हणजे नवीन परिस्थितीत बदल घडले ते कोणते? शासन हे संतुलित आलं आहे. कोणताही राजकीय पक्ष मोठा राहिलेला नाही; पण राजकारणामध्ये खरा संघर्ष आता अयोध्यावादीविरुद्ध सोनियावादी असा आला आहे. शेतकऱ्याला बदनाम करणाऱ्या माणसांनी त्यांचं काम बजावलंय. शेतकरी आंदोलन काही प्रमाणात बदनाम झालं आहे आणि त्याची पारंपरिक सत्याग्रहाची साधनं निष्प्रभ झाली आहेत. शेतकऱ्यांना बुडविण्याची सरकारची इच्छा काही कमी झालेली नाही; पण शेतकऱ्यांना बुडविण्याची ताकद आता सरकारमध्ये राहिलेली नाही. लोकात कमालीची निराशी तयार झाली आहे. मोठ्या आशेने ते देशाला संकटातून तारून नेणाऱ्या नव्या युगपुरुषाची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आंदोलन पुढे कसं न्यायचं?
 १९८० मध्ये वर्ध्याला जेव्हा पहिलं शिबिर झालं, त्या शिबिरावर एक लहानशी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ५५