पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शकत नाही.
 देशावरचं संकट केव्हा सुटेल? ज्या दिवशी आपण आपल्या आयातीपेक्षा निर्यात जास्त करायला लागू, आपण जितका माल बाहेरून मागवतो त्याच्यापेक्षा जास्त माल बाहेर पाठवायला लागू त्यादिवशी आपलं संकट सुटायला सुरुवात होईल आणि सध्याच्या शासनाच्या धोरणातून हे होण्याची काहीही शक्यता नाही. अगदी साधी गोष्ट घ्या. कारखाने काय करतात? समजा, आपल्या हिंदुस्थानातला एक कारखाना कॉम्प्युटर तयार करतो. म्हणजे, त्याच्यातल्या निम्म्या गोष्टी आधी बाहेरूनच आणतो. त्या बाहेरून आणलेल्या वस्तू इथं एकत्र जुळवल्या जातात. अशी जुळवलेली वस्तू, म्हणजे अमेरिकेतल्या किंवा यूरोपातल्या माणसाच्या दृष्टीने आडगिऱ्हाइकी मालच झाला. गचाळ माल झाला. तो विकत घ्यायचं त्याचं काय अडलंय? यूरोपातला देश जो माल तयार करतो त्याची नक्कल तुम्ही इथं तयार करणार, थातुरमातुर नक्कल करणार आणि यूरोपातल्या माणसाने, ज्याने तो माल शोधून काढला त्यांनीच तो विकत घ्यावा अशी अपेक्षा ठेवणार! हे घडणे कधीही शक्य नाही. तेव्हा नेहरूवादाचा पराभव हा जोपर्यंत अशा कारखानदारीचं कौतुक चालू आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे, त्यातून सुटका नाही.
 हतबल सरकार
 पण याच्यात आपला फायदा काय झाला? शेतकऱ्यांना याच्यात एक मोठी संधी मिळाली हे लक्षात ठेवायला हवे. कपाशीचा भाव पाडण्याकरिता परदेशातून कापूस आणून हिंदुस्थानामधला भाव पाडणे हे अजूनही एखादेवेळी सरकार करू शकेल, एखादेवेळी लाख दोन लाख गाठी कदाचित आणेलही; पण फार मोठ्या प्रमाणावर पूर्वीसारखं असं करणं सरकारला अशक्य आहे. कारण, मग देशाचं पुरतंच दिवाळं वाजल्याशिवाय राहणार नाही. कपाशीच्या निर्यातीवर बंदी घालण्याची भाषा आजसुद्धा चालू आहे; पण विजय जावंधियांनी तुम्हाला सांगितलं की ती बंदी त्यांना उठवायलाच लागणार आहे आणि ती उठवली नाही तर आपण आहोत ना तिथं? पण त्यांना आज तशी बंदी घालणं शक्य नाही. रुपयाची किंमत सातत्याने अवास्तव जादा ठेवलेली. त्यामुळे शेतकऱ्याला निर्यात करायला त्रास होत होता. आज त्यांना झक्कत रुपयाचं मूल्य २१ टक्क्यांनी कमी करायला लागलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता माल जर परदेशात पाठवला तर त्यांना बाजापेठ मिळण्याची आणि चांगली किंमत मिळण्याची शक्यता वाढली. म्हणजे, सरकार शेतकऱ्यांविरुद्ध जी जी हत्यारं वापरत होतं ती ती हत्यारं आता निकामी झाली आहेत. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू नये म्हणून सरकार जे जे करत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ५४