पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहिजे. त्याचा व्यापार चांगला केला पाहिजे, आवश्यक तर निर्यात केली पाहिजे हे आम्हालाही समजतं. त्याकरिता सहकारी संस्था काढल्या पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका काढल्या पाहिजेत हेही आमहाला समजतं. फक्त, आमचा अनुभव कसा आहे की सगळं केलं, वेगवेगळ्या प्रकारचा माल पिकवला, अगदी टाकटुकीने, काटकसरीने पिकवला, साठवणुकीची व्यवस्था केली, प्रक्रियेची व्यवस्था केली, सहकारी संस्था काढल्या, बँका काढल्या आणि तरीसुद्धा सरकारने ठरवलं, की तुम्हाला भाव मिळू द्यायचा नाही तर तुमच्या या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडतं.
 आणि म्हणून शेतकरी संघटना ही आंदोलक संघटना बनली. तिने वेगवेगळी आंदोलनं केली आणि दहा वर्षांमध्ये एक बदल घडवून आणला. निदान, कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे हे कलम घालणं आवश्यक वाटू लागलं. इतका तरी बदल आपण घडवून आणला. १९८९ च्या निवडणुका, जनता दलाचं निवडून येणं, राष्ट्रीय कृषिनीती तयार करण्याची घोषणा, वेडीवाकडी का होईना पण कर्जमुक्ती हा सगळा इतिहास तुमच्यासमोर घडून गेला आहे. त्याविषयी तुमच्यासमोर मी अनेकदा बोललेलो आहे. या दोन वर्षांमध्ये जे काही घडलं त्यावर बोलण्यात मी आता जास्त वेळ घालवू इच्छित नाही.
 राजकीय परिस्थिती
 आज जी काही परिस्थिती दिसते ती परिस्थिती मी आपल्यापुढे मांडणार आहे. आपण आंदोलनाच्या काळात नेहमी असं म्हटलं, निवडणुकीसंबंधी भूमिका घेताना म्हटलं की आपल्याला काँग्रेसबद्दलही प्रेम असण्याचं कारण नाही. काँग्रेस हा अजून आपला नंबर एक शत्रू आहेच; पण त्याच्याबरोबर विरोधी पक्ष राज्यावर आले म्हणजे ते काही शेतकऱ्यांचं भलं करतील हेसुद्धा काही खरं नाही. आपला मित्र असा राजकीय पक्ष कोणताच नाही. आपल्याला काय पाहिजे? छोटा चोर आणि मोठा चोर यांच्यामध्ये समतोल असावा. मी काय वाक्य वापरलं होतं? की मोठा चोर आपल्या छातीवर बसालाय, त्याला लहानग्या चोराच्या मदतीनं जर उठवता आलं तर तो धाकटा चोर आपल्या छातीवर बसायच्या आधी पटकन उडी मारून उठता आलं तर आपल्याला संधी मिळेल; तेव्हा दोन चोरांमध्ये लढाई लावून देणं हे खरं आपलं धोरण आहे. आंदोलनाच्या दृष्टीने राजकीय संतुलन पाहिजे हे आपलं पाहिलं उद्दिष्ट आणि आज ते राजकीय संतुलन तुमच्यापुढे फार चांगल्या अवस्थेत मिळालेलं दिसत आहे. काँग्रेसचं सरकार केव्हाही पडू शकतं. राजकीय संतुलन आहे याचा एक चांगला पुरावा असा की एवढ्या निश्चयाने डॉ. मनमोहन सिंगांनी खताच्या किमती वाढवल्यानंतर लोकसभेमध्ये

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो /५१