पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकऱ्यावर सरकार तुटून पडतं. हे धोरण कोणा एका पक्षाचं किंवा एका सरकारचं नव्हे, हे धोरण व्यवस्थेचं आहे. एका पक्षाचं सरकार काढून टाकून दुसऱ्या पक्षाचं सरकार आणल्याने काही होणार नाही. मग काय केलं पाहिजे? या कडेकोट बंदोबस्ताला फोडायचं असेल तर उपाय एकच आहे असं मी त्यावेळी सांगितलं, आजही ते तुम्ही 'शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती' या पुस्तकात वाचू शकता. काय करावं? काहीही करा, पण एक आठदहा शेतीमालाला दोन किंवा तीन वर्षे उत्पादनखर्चावर आधारित अगदी रास्त भाव न मिळाला तरी पण बऱ्यापैकी जरी भाव मिळाला तरी शेतकऱ्याची थांबण्याची ताकद वाढेल. इतकी वाढेल, की त्यामुळे तयार झालेला माल धावत घेऊन बाजारात जाण्याची त्याला आवश्यकता पडणार नाही आणि या किल्ल्याचा दरवाजा उघडला जाईल. एक एक लढा. आज कांद्यात काही मिळालं, उद्या उसात मिळालं, परवा कपाशीत मिळालं, काही भाव नाही मिळाला तरी निदान शेतकऱ्यांमध्ये जागृती झाली आणि एक दिवस असा उगवेल मी ज्यावेळी आपल्याला, शेतकऱ्यांना शेतामध्ये तयार झालेला माल धावत घेऊन बाजारात जाण्याची गरज पडणार नाही.
 हे साध्य करण्याकरिता आपण कितीक हत्यारं वापरली. सत्याग्रहाचं हत्यार वापरलं, चाकणला आम्ही रास्ता रोको केलं, उपोषण केलं, नाशिकला रास्ता रोको केलं, रेल रोको केलं. अगदी नाशिकच्या ऊस आंदोलनातसुद्धा रस्त्यावर उतरण्याच्या आधी बांधावरचं आंदोलन झालं. शेतकऱ्यांनी कारखान्यात ऊस फक्त जाऊ द्यायचा नाही असं या आंदोलनाचं आर्थिक स्वरूप होतं; पण पावसाने डोळे वटारले, वीज मंडळाची अवकृपा झाली, ऊस वाळू लागला आणि शेतकऱ्यांची आर्थिक ताकद कमी पडली आणि मग रस्त्यावर जावं लागलं. दूध आंदोलनामध्येही असंच झालं. म्हटलं, इथं रस्ता अडवायचा नाही, रेल्वे अडवायची नाही- फक्त आर्थिक हत्यार वापरायचं. म्हणजे दूध पाठवायचं बंद करायचं. गांधींचं हत्यार सत्याग्रहाचं. त्यांच्याबरोबर शेतकऱ्यांचं हत्यार अन्न अडवायचं. आर्थिक आणि सत्याग्रहाचं अशी दोन हत्यारं आपण वापरत होतो. फक्त दुधाच्या आंदोलनामध्ये आपण पहिल्यांदा एक प्रयोग केला की फक्त आर्थिक हत्यार वापरायचं, सत्याग्रह वापरायचं नाही आणि परिणामी काय झालं? दूध आंदोलनात आपला पाडाव झाला. ते मी कबूल केलं आणि असं म्हटलं की शेतकऱ्यांची ताकद अजून केवळ आर्थिक हत्यारानं लढण्याइतकी झालेली नाही. आपण जर किमान ४० टक्के दूध थांबवू शकलो असतो तर जिंकलो असतो. आपण ३० टक्केच दूध थांबवू शकलो आणि हरलो. १९८४ मध्ये परभणीच्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा आपण काही आर्थिक हत्यारं दिली. तुम्हाला आठवत असेल. काय काय

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ४९