पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

याच्याबरोबरच आणखी एक गोष्ट घडण्याची शक्यता आहे. मी गेल्या सत्रात राज्यसभेत भाषण करताना म्हटले की, '२० जानेवारी २००९ रोजी बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी अमेरिकी फौजा इराकमधून काढून घ्यायला सुरुवात केली की सगळे आतंकवादी उन्मत्त होऊन विजयाच्या आरोळ्या ठोकत सगळीकडे आतंकवादाचा धुडगूस घालणार आहेत. अमेरिकन सिनेटला रँड कॉर्पोरेशनने जो अहवाल दिला आहे त्याप्रमाणे या आतंकवादाचा सगळ्यात मोठा फटका हिंदुस्थानला बसणार आहे. कारण हा देश त्याच्या भाईभाईवादामुळे आपले मूळचे तेज गमावून बसला आहे, पुळचट बनला आहे.'
 आपण एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकांची तयारी करू लागलो आहोत पण कदाचित चार-पाच महिन्यांच्या आत तालिबानी लोक काश्मीरमध्ये घुसण्याची शक्यता आहे. मग, निवडणुकाच होतील का नाही अशी शंका येते.

 रामदेवबाबांनी एक पत्र प्रसृत करून त्यांच्या भक्तांना निवडणुकीत मतदान कसे निर्भीडपणे आणि सजगपणे करावे यासंबंधी मार्गदर्शन केले आहे. आपल्या काही कार्यकर्त्यांनीही त्यांच्याबद्दल ममत्व वाटून मी त्यांची भेट घेऊन त्यांना आपल्याशी जोडून घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. रामदेवबाबांनी आपले साहित्य वाचले आहे किंवा नाही मला माहीत नाही, बहुधा वाचले नसावे. शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष गेली अनेक वर्षे व्यक्तिस्वातंत्र्याची जोपासना करण्यासाठी ज्या गोष्टी सांगत आहे त्याच कालपरवा सांगायला सुरुवात केलेल्या व्यक्तीकडे मदतीची याचना करायला जाण्याची आम्हाला, आवश्यकता काय? आपल्या ज्या कार्यकर्त्यांना रामदेवबाबांबद्दल ममत्व वाटत असेल त्यांनी त्यांच्याकडे आपले सगळे साहित्य पोहोचवून त्यांना समजावून द्यावे. मग त्यांना ते पटले तर ते आपणहून आपल्याकडे येतील, आपण त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही.
 आता प्रश्न उरतो तो निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर जावे? छोट्याछोट्या पक्षांची आघाडी बांधावी अशी काही कार्यकर्त्यांची सूचना आहे; पण मी कोणत्याही छोट्या पक्षाशी दोस्ती करू इच्छीत नाही. कारण, एकवेळ सत्ताधीशांचा अहंकार आणि दर्प परवडतो पण ज्यांच्याकडे सत्ता नाही, येण्याचीही शक्यता कमी त्यांच्या मनाचा हलकेपणा सोसवत नाही. ज्यांच्याकडे सत्ता नाही, शहाणपणही नाही आणि आविर्भाव मात्र अवाढव्य असतो त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. आजकाल गाजणारे मायावती आणि मुलायम यांच्यासारखे लोक अल्पावधीतच इतिहासाच्या उकिरड्यात जाऊन पडतील. त्यांना काय नाचायचे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३१७