पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकऱ्यांना एकत्र ठेवा. सगळे शेतकरी जर एकत्र राहिले नाहीत तर शेतकऱ्यांना बरे दिवस कधीच दिसणार नाहीत. कोणतीही चळवळ असो - दलितांची असो, आदिवासींची असो, मुसलमानांची असो - सगळेजण एक होतात. पण शेतकऱ्यांचा प्रश्न घ्यायचा झाला तर फुटाफूट होते. कोणाला नेता व्हायचे असते, कोणाला आणखी काय व्हायचे असते, कोणाला आणखी काय साधायचे असते. शेतकऱ्यांची एकजूट होऊन, शेतकऱ्यांच्या लुटीवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लागू नये अशी कल्पना बाळगणारे लोक अशा फुटीरांना आधार द्यायला टपलेलेच असतात. ज्या लोकांनी कर्जमाफीचे आणि वीजबिल माफीचे खोटे आश्वासन देऊन सत्ता आल्यानंतरसुद्धा कर्जमाफी केली नाही त्यांच्या मदतीने शेतकरी संघटनेला कमकुवत करू पाहणारी माणसे शेतकरी संघटनेची असूच शकत नाहीत. अशा लोकांचे काय करायचे ते शेतकऱ्यांनी आपले आपण ठरवावे. मला मात्र वाटू लागले आहे की माझ्या पत्नीचा शाप मला भोवतो आहे आणि म्हणून ही सगळी फुटाफूट होते आहे. आज जर का आपण सगळे एकत्र असतो तर आज निवडणुकीचा निर्णय घेणे कठीण गेले नसते आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणेही कठीण राहिले नसते.
 स्वातंत्र्य मिळाल्याला पन्नास वर्षे झाल्यानंतर, १९९८ साली आपण अमरावतीला जनसंसद भरवली आणि देशाच्या त्या पन्नास वर्षांच्या कारभाराचा लेखाजोगा काढला. आज त्यालाही दहा वर्षे होऊन गेली आणि भारतीय गणराज्याचीही ६० वर्षे पुरी होत आहेत. तरीसुद्धा, आपल्या देशाची परिस्थिती अधिकाधिक बिकट का होत चालली आहे? इंग्रज गेल्यानंतर शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल अशी आशा वाटली होती पण शेतकरी परिस्थितीने हतबल होऊन लाखांच्या संख्येने आत्महत्या करतात असे का व्हावे? शेतकरीच नव्हे तर अगदी सर्वसामान्य माणसालासुद्धा आपल्या घरातील मुलगा किंवा मुलगी घराबाहेर गेली तर संध्याकाळी हातीपायी धड, सुखरूप घरी परत येईल का नाही याबद्दल खात्री वाटत नाही ही परिस्थिती स्वतंत्र हिंदुस्थानात का तयार झाली? वर उल्लेख केलेल्या माझ्या 'आता देशाला वाचविणे फक्त मतदारांच्या हाती' या लेखात मी याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी हा लेख वाचला नसेल त्यांनी तो काळजीपूर्वक वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा आणि विचार करा.
 एखाद्या उपाशी माणसासमोर भरलेले ताट येताच तो जसं बकाबका खातो तसे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर गोऱ्या इंग्रजांनी सोडून दिलेल्या सत्तेवर समाजवादाचा घोष करीत जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली आलेल्या काळ्या इंग्रजांना,

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३१४