पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना


 देशातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती इतकी गंभीर आणि गुंतागुंतीची झाली आहे की येत्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेने आणि स्वतंत्र भारत पक्षाने घ्यावयाच्या भूमिकेसंबंधी विचारविनिमय करण्यासाठी बोलाविलेल्या या बैठकीला येताना, अगदी आज सकाळपर्यंत, काय भूमिका घ्यावी यासंबंधी माझ्या मनात काही दिशा स्पष्ट नव्हती. बैठकीला किती लोक येतील अशीही मनात शंका होती. कोणत्या रस्त्याने जावे म्हणजे शेतकऱ्यांचा आपल्याला पुरेसा पाठिंबा मिळेल असा प्रश्नही मनात घुमत होता.
 या मनःस्थितीने मला अगदी सुरुवातीच्या काळात नेले. ९ नोव्हेंबर १९८० ला म्हणजे नाशिकचे कांदा-ऊस आंदोलन सुरू व्हायचे होते त्याच्या आदल्या रात्री झोप लागेना. मनात फक्त एकच चिंता दाटली होती की नाशिकच्या रेल्वे लाईनवर शेतकरी खरोखरी येतील ना? पण, मध्यरात्रीनंतर उशिरा बागलाणमधील एका शेतकऱ्याचा फोन आला, तो म्हणाला, "आम्ही शंभरेक बैलगाड्या घेऊन आंदोलनाच्या ठरलेल्या ठिकाणी आलो आहोत. आता रेल्वे लाईनवर बसू की सकाळी ८ वाजेपर्यंत थांबू?" या फोनमुळे माझ्या मनात आंदोलनाविषयी ज्या काही शंका होत्या त्या सगळ्या मिटल्या.
 ९ नोव्हेंबर १९८० च्या त्या रात्रीप्रमाणेच आज सकाळीही या बैठकीला येण्याआधी माझी मनःस्थिती मोठी शंकाकुल झाली होती. या बैठकीला येऊन फारसे काही काम होईल, काही महत्त्वपूर्ण निर्णय घेता येतील असे खरेच त्यावेळी माझ्या मनाला वाटत नव्हे; पण या बैठकीत तुम्ही कार्यकर्त्यांनी भाषणे करून जी काही मांडणी केली त्यावरून मला विश्वास वाटू लागला आहे की आपल्याला जी दिशा शोधायची आहे ती, मला सकाळी वाटत होते तितकी काही अंधकारमय नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून जी काही मांडणी केली आहे त्यावरून

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३१०