पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 आयटी म्हणजे माहिती तंत्रज्ञान.
 या चारही विषयांवर गेल्या तीन दिवसात विस्ताराने चर्चा झाली; पण अधिवेशन आणि अधिवेशनाची विषयसूची जाहीर झाल्यानंतर जगामध्ये आणखी एक गंभीर घटना घडली त्याची चर्चाही या तीन दिवसांत गांभीर्याने झाली.
 आतापर्यंत आंदोलन कापसाचे असो, उसाचे असो का गव्हाचे असो. शेतकरी संघटनेला म्हणता येत असे की, विदर्भातील कापसाला भाव मिळत नाही कारण सरकार विदर्भातील कापूस आंध्रात जाऊ देत नाही, मध्यप्रदेशात जाऊ देत नाही, परदेशात जाऊ देत नाही; बाहेरच्या बाजारातील किमती नेहमी चांगल्या असतात आणि आमच्याकडेच कमी असतात. सरकारने बंधने काढावीत म्हणजे सगळे काही ठीक होईल.
 गेल्या महिनाभरात सगळ्या जगामध्ये एक आर्थिक अरिष्ट आले आहे. त्यामुळे बँका बंद पडत आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिका, युरोप, आइसलँड सारख्या विकसित राष्ट्रसमूहांमध्ये हजारोंच्या संख्येने लोक बेकार होत आहेत. हा मोठा धक्का आहे. कारण शेतकरी संघटनेने मांडणी केली की व्यवस्था खुली करा म्हणजे शेतकऱ्यांना भाव आपोआप मिळेल; पण सध्याच्या आर्थिक अरिष्ट्यामुळे आज हिंदुस्थानात मिळणारा भावही आंतरराष्ट्रीय बाजारात मिळेलच याची शाश्वती न राहिल्यामुळे शेतकरी संघटनेने पुढची वाट कोणती काढायची हा यक्ष प्रश्न तयार झाला आहे.
 ज्या शेतकरी नेत्यांचा अभ्यास नाही, व्यासंग नाही ती मंडळी अजूनही शेतकऱ्यांच्या नावाने कोणत्या कोणत्या कोपऱ्यामध्ये, १९८० साली शेतकरी संघटनेने वापरलेली वाक्ये आणि वापरलेल्या घोषणा अजूनही वापरतात; पण जग बदलले आहे याची त्यांना कल्पनाही नाही; पण गेल्या तीन दिवसांत मला मोठा सुखद अनुभव आला. प्रतिनिधी मंडपात हजारो प्रतिनिधी होते, माझ्या महाविद्यालयाच्या वर्गात कधीही शंभरच्यावर विद्यार्थी नव्हते. या हजारो प्रतिनिधीतील एक शेतकरी माझ्याकडे आला. तो जगातल्या आर्थिक मंदीने घाबरलेला नव्हता. या आर्थिक मंदीवर वर्तमानपत्रांत भरभरून लिहिले जात आहे. मीही थोडेफार लिहिले आहे. पण माझ्याकडे आलेल्या त्या अ(र्ध)शिक्षित शेतकऱ्याने मला जगाच्या अर्थशास्त्रातले एक तत्त्वज्ञान सांगितले. तो म्हणाला, "साहेब, आपण शेतकरी आहे. जे झाड आपण लावतो त्या झाडाची पानगळ होतच असते. ज्या झाडाची पानगळ होत नाही ते झाड संपले आहे असे समजायचे."
 आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान मनमोहन सिंगांचे एक विधान आले आहे; ते म्हणतात की, 'आपण इतक्या वेगाने विकासाचा दर

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३०३