पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि तुम्हाला धन्यवाद देतो.
 तीन दिवसांच्या या अधिवेशनातील चर्चेचे विषयही काही साधे नव्हते. उदाहरणार्थ, 'जागतिक हवामान बदला'च्या विषयांत माहिती देण्यासाठी जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आले, त्यांनी संगणकाच्या साहाय्याने विषयपरिचय (Presentation) करून दिला, आकडेवारी दाखवली; तसेच 'ऊर्जास्वातंत्र्या'च्या चर्चेत इथेनॉल कसे तयार करायचे यासंबंधी तज्ज्ञांनी भाषणे केली आणि ज्या अतृप्त आतुरतेने माझे सर्व शेतकरी भाऊबहिणी ते ज्ञान पीत होते ते पाहून मला असे वाटले की माझ्या जीवनाचे सार्थक झाले.
 अनेक लोकांना आजचे हे अधिवेशन पाहून त्यासंबंधी ऐकून आश्चर्य वाटले असेल. शेतकरी संघटनेचे अधिवेशन तीन दिवस चालले. अधिवेशन किंवा सभा म्हणजे दोनचार लोकांनी मांडीवर शड्डू ठोकून राणा भीमदेवी थाटाची भाषणे करायची, विरोधकांना किंवा शासनाला शिव्या द्यायच्या, आग लावायची भाषा करायची, दंगाधोपे करायची भाषा करायची असे इथे काहीच झाले नाही. जी काही भाषणे झाली, विचारविनिमय झाला ते सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतले प्रश्न विचारून, अत्यंत बुद्धिमान प्रश्न विचारले. आपले शंकानिरसन करून घेतले. या गोष्टींमध्ये एका क्रांतीची बीजे लपलेली आहेत ते मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे.
 अधिवेशनाचे प्रयोजन
 हे अधिवेशन मी कशाकरिता बोलावले? मी मराठवाड्यातील जिल्ह्यांत केलेल्या निमंत्रणाच्या भाषणात आणि शेतकरी संघटकाच्या (२१ ऑक्टोबर २००८) अंकातून दिलेल्या निमंत्रणात म्हटले की, "२००४ साली केंद्रातील सरकार बदलले, संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ)चे सरकार आले आणि शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे फेरे चालू झाले. २००५ सालापासून ते २००७ सालापर्यंत हिंदुस्थानातील एक लक्ष साठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील सगळ्यात मोठी संख्या महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील शेतकऱ्यांची आहे. शेतकरी आत्महत्या करतात त्यामागचे कारण सगळ्यांना माहीत आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरचा इतिहास पाहिला तर असे आढळून येते, की त्यातील ९९ टक्के शेतकरी कर्जात बुडलेले होते, कर्जाची परतफेड करता येत नाही म्हणून वसुलीसाठी अधिकारी आले तर आपली बेअब्रू होऊ नये, घरदार बदनाम होऊ नये म्हणून कोठेतरी कोपऱ्यात जाऊन गळ्याला फास लावून घेतात किंवा पिकावर फवारायला आणलेली औषधाची बाटलीच पिऊन टाकतात आणि आपले आयुष्य संपवतात. कर्जबाजारीपणा हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २९९